शहरात दुचाकी टॅक्सीची किक 

शहरात दुचाकी टॅक्सीची किक 
शहरात दुचाकी टॅक्सीची किक 
शहरात दुचाकी टॅक्सीची किक 
Published on
Updated on

पिंपरी : पंकज खोले : प्रवासीसेवेसाठी सोयीस्कर दुचाकी, टॅक्सी बोलावत असाल. त्यातून प्रवास करून थोडे पैसे वाचवत असला तर सावधान! अशा दुचाकी, टॅक्सीवर येत्या काळात आरटीओकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.

आरटीओच्या म्हणण्यानुसार हा प्रवास तुम्हाला धोकादायक ठरू शकतो. तर, अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवासी घेणारा चालकही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो. गेल्या आठवड्यात शहरात सहा जणांवर कारवाईचा बडगा आरटीओने उचलला आहे.

प्रवासासाठी वापरण्यात येणारे रिक्षा, मोटारीवर नियंत्रण ठेवणारी 'आरटीओ' यंत्रणा दुचाकी टॅक्सीच्या जाळ्यापुढे हैराण झाली आहे. या माध्यमातून होणारे नियमांचे उल्लंघन आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी आरटीओकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात प्रवासीसेवेसाठी जवळपास 25 हजार रिक्षा धावतात. तर, त्या जोडीला खासगी ऑनलाइनच्या माध्यमातून मोटारी जोडल्या आहेत. त्यास रिक्षा संघटनेकडून विरोध सुरू असताना आता, नुकत्याच सुरू झालेल्या दुचाकी टॅक्सीचा मोठा वापर वाढला आहे.

किलोमीटर व वेळेच्या गणितानुसार पैसे आकारण्यात येत असल्याने त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे. तर, नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अगदी नाममात्र दरात ते प्रवासीसेवा देत असल्याने त्याचा वापर अलीकडच्या काळात वाढला आहे. एकट्याला प्रवासासाठी रिक्षा सोईस्कर व महागडी असल्याने त्याचा मोठा ग्राहक हा या अ‍ॅपकडे वळू लागला आहे.

कारवाई दुचाकी वाहन संवर्गामध्ये हे ना वाहतूक सेवा (नॉन ट्रान्स्पोर्ट) आहे. त्यामुळे त्यास परवानगी नाही. मोटार वाहन कायदा 1988 मध्ये रेन्ट अ मोटार सायकल स्किम 1997 उपलब्ध असून, त्यात वापरात येणारी वाहने ही भाडोत्री परिवहन संवर्गात नोंद असणे आवश्यक आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरच हा व्यवसाय सुरू करता येतो. अशी कोणतीच परवानगी त्या कंपनीकडे नसल्याचे आरटीओचे म्हणणे आहे.

सहा वाहनांवर कारवाई

शहरातील ओला, उबेर आणि रॅपिडो या ऑनलाइनच्या माध्यमातून दुचाकी टॅक्सीचे पेव फुटले आहे. गेल्या आठ दिवसांपासून आरटीओच्या माध्यमातून त्यावर पाळत ठेवण्यात येत आहे.

शहरातील विविध भागांत डमी ग्राहक बनवून आरटीओ कर्मचार्‍यांनी अशा सहा दुचाकी वाहनांवर कारवाई केली आहे. ती वाहनांवर खटला नोंदवून ती ताब्यात घेण्यात आली आहेत.

एका फेरीमागे पैशाचे आमिष

दुचाकीधारकांना या ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून एका फेरीमागे 15 ते 20 रुपये व इतर प्रोत्साहन भत्ता देण्याचे आमिष दाखवले जाते. ऑनलाइन आरसी बुक, फोटो आणि आधारकार्ड या साध्या स्टेपच्या माध्यमातून त्यांना या व्यवसायाचा आयडी दिला जातो.

हे सर्व काम ऑनलाइन व मोबाईलद्वारे चालवले जाते. आपल्या फावल्या वेळेत पैसे कमाविण्याच्या नादात अनेक तरुण याला बळी पडतात.

"नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून अशा खासगी कंपनीच्या अ‍ॅपवरून सेवचा लाभ घेऊ नये. अशा सेवेचा लाभ घेताना संबंधित प्रवाशास कोणाताही अपघात विमा संरक्षण मिळू शकणार नाही. तसेच, यातील चालक विनाहेल्मेट व नियमांचे उल्लंघन करीत असल्याने आता यापुढे कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे."

अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news