भरधाव कारने रिक्षाला उडविले; सुदैवाने जीवितहानी नाही

भरधाव कारने रिक्षाला उडविले; सुदैवाने जीवितहानी नाही

पुणे/येरवडा : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात कल्याणीनगरमधील घटनेनंतर पुन्हा एकदा ड्रंक अन् ड्राईव्हचा प्रकार समोर आला आहे. धानोरी परिसरात नुकतेच बारावी पास झालेल्या 19 वर्षीय तरुणाने भरधाव कार चालवत रस्त्याच्या कडेला रिक्षात थांबलेल्या कुटुंबातील चौघांना उडविले. या अपघातात लहान मुलीसह तीन महिला जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर नागरिकांनी कारचालक तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मद्यपानाच्या नशेत तरुणाई धुंद

दरम्यान, तो तरुण दारू प्यायला होता, असे रिक्षाचालक असलेल्या कुटुंबप्रमुखाने पोलिसांना माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा ड्रंक अन् ड्राईव्ह झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताची धग कायम असतानाच हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आर्यन करुण चतुर्वेदी ऊर्फ आर्यन संतोष थोरात (18, रा. धानोरी) याला अटक केली आहे. याबाबत अशोक तुकाराम पायाळ (वय 40, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आर्यनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि.17) रात्री सव्वाबाराच्या सुमारास प्राईड आशियाना सोसायटीसमोर परांडेनगर लोहगाव परिसरात घडली आहे. अमृता अशोक पायाळ (वय 12), सायबिन युवराज साळवे (वय 58), ज्योती अशोक पायाळ (वय 35), सानिका महादेव साळवी (वय 6) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

नेमके काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक अशोक पायाळ धानोरी भागात राहण्यास आहेत. त्यांच्या मालकीची रिक्षा आहे. रविवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास आइस्क्रीम खाण्यासाठी पायाळ हे सर्व कुटुंबीयासह रिक्षाने परांडेनगर लोहगाव येथे आले होते. रिक्षा रस्त्याच्या कडेला पार्क करून पायाळ खाली उतरले. तेवढ्यात भरधाव कारने त्यांच्या रिक्षाला जोरात धडक दिली. कारने जेव्हा रिक्षाला धडक दिली, तेव्हा त्यांची पत्नी ज्योती, सासू सायबीन, भाची सानिका, मुलगी अमृता या रिक्षात बसलेल्या होत्या.

डी. वाय. पाटील रोडकडून जकात नाक्याकडे जाताना कारने ही धडक दिली. कारच्या धडकेत रिक्षा उजव्या बाजूने पलटी झाली. मोठा आवाज झाल्याने येथील नागरिकही भयभीत झाले. अपघात होताच आरडाओरडा सुरू झाला. नागरिकांनी धाव घेत जखमी मुली व महिलांना बाहेर काढत जवळच्या खासगी रुग्णालयात नेले आणि कारचालक असलेल्या आर्यनला पकडत चोप दिला. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक तरुणाला ताब्यात घेतले. अपघातात रिक्षातील मुलीसह तीनही महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये कोणीही गंभीर जखमी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्यनच्या तोंडाचा वास येत होता..!

रिक्षाचालक असलेल्या अशोक पायाळ व नागरिकांनी चालक आर्यनला पकडले, तेव्हा त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता, असे अशोक यांनी विमानतळ पोलिसांना सांगितले आहे. यानुसार, पोलिसांनी आर्यन याला ताब्यात घेतले असून, त्याला न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्याची रक्तचाचणी करण्यास लावले.

चारचाकी कारने रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या रिक्षाला धडक दिली. त्यामध्ये चौघे जखमी झाले आहेत. आर्यन नावाच्या कारचालक तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मद्यप्राशन केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार तपास सुरू आहे.

– आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस ठाणे

हेही वाचा

  • 'नीट' गोंधळाविरोधात 'आप' देशभर आंदोलन करणार : संदीप पाठक
  • Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनावेळी भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
  • मनोज जरांगेंसाठी रेड कार्पेट, आमची साधी दखल नाही : लक्ष्मण हाके

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news