‘ससून’चा 117 पानी लेखाजोखा; सातत्याने गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर विशेष समितीकडून अहवाल

‘ससून’चा 117 पानी लेखाजोखा; सातत्याने गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर विशेष समितीकडून अहवाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा धक्कादायक प्रकार ससून रुग्णालयात घडला. त्यामुळे ससूनच्या कामकाजावर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ससूनची डागाळलेली प्रतिमा सुधारावी आणि कामकाजात पारदर्शकता, सुसूत्रता यावी, यासाठी विशेष समितीकडून 117 पानांचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयात गेल्या वर्षभरात सातत्याने गैरप्रकार समोर येत आहेत. ललित पाटील प्रकरण, आयसीयूमध्ये उंदराच्या चाव्यामुळे रुग्णाचा मृत्यू, डॉक्टरांकडून रुग्णांकडे पैशांची मागणी, आरोपीचे रक्तनमुने बदलासारखा गंभीर गुन्हा, यामुळे ससून सातत्याने वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. ससूनमधील कर्मचारी, डॉक्टर यांच्याबाबत आणि पारदर्शक रुग्णसेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने कामकाजावरही टीका केली जात आहे.

ससूनची प्रतिमा बदलण्यासाठी आणि रुग्णसेवेला प्राधान्य देण्यासाठी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमली होती. रुग्णालयातील त्रुटी, कमतरता, कामकाजातील अभाव, याबाबत पाहणी करून आणि अभ्यास करून समितीने 117 पानी अहवाल तयार केला आहे. अहवालाचा अभ्यास करून त्याद़ृष्टीने सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याद़ृष्टीने काही बदल केले जाणार असल्याचे डॉ. म्हस्के यांनी सांगितले.

काय बदल घडणार?

  • आपत्कालीन वैद्यकीय अधिकार्‍यासह वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी आपत्कालीन कक्षात कार्यरत राहणार.
  • आपत्कालीन विभागात लाकडी पार्टिशनऐवजी काचेचे पार्टिशन लावणार.
  • आरोपींच्या रक्तनमुन्यांचे संकलन, तपासणीसाठी स्वतंत्र रजिस्टर.
  • वैद्यकीय अधीक्षकांकडून रजिस्टरची दररोज होणार तपासणी.
  • औषधांच्या उपलब्धतेला प्राधान्य.
  • स्ट्रेचर आपत्कालीन विभागाच्या आत ठेवण्याऐवजी बाहेर स्वतंत्र शेडमध्ये ठेवणार; जेणेकरुन रुग्णांना तातडीने उपचारांसाठी नेता येईल.
  • व्हीलचेअरचीही बाहेरच्या भागात सोय.
  • रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी सुरक्षारक्षकांनीही मदत करण्याच्या सूचना.
  • डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना वेळोवेळी प्रशिक्षण.

ससून सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवेला प्राधान्य मिळावे आणि कामकाजात सुसूत्रता, पारदर्शकता यावी, यासाठी विशेष समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. अहवालातील त्रुटींचा अभ्यास करून रुग्णालयात काही
सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. सुधारणांची लवकरात लवकर अंमलबजावणी
केली जाईल.

– डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

हेही वाचा

  • 'नीट' गोंधळाविरोधात 'आप' देशभर आंदोलन करणार : संदीप पाठक
  • Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनावेळी भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
  • मनोज जरांगेंसाठी रेड कार्पेट, आमची साधी दखल नाही : लक्ष्मण हाके

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news