रेल्वेयार्डात पडलेल्या पितृतुल्य वृद्धाला वाचविले; स्टेशनमास्तरची उल्लेखनीय कामगिरी

रेल्वेयार्डात पडलेल्या पितृतुल्य वृद्धाला वाचविले; स्टेशनमास्तरची उल्लेखनीय कामगिरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवस होता 'फादर्स डे'चा… ऊन उतरून गेले होते… पुणे रेल्वेस्थानकाचे स्टेशनमास्तर अनिलकुमार तिवारी सायंकाळच्या ड्युटीसाठी पुणे रेल्वेस्थानकावर हजर झाले, सही मारली, कामाला सुरुवात करणार, इतक्यात त्यांचा फोन खणाणला. समोरून प्राणिमित्र संकेत बोलत होता. त्याने पुणे रेल्वेयार्डात वृद्ध माणूस बेशुद्धावस्थेत असल्याची खबर दिली. वृद्धाच्या पायाला मोठी जखम झाली होती. माहिती मिळताच क्षणाचाही विचार न करता तिवारी जागेवरून उठले अन् त्यांनी यार्ड गाठले. तेथील परिस्थिती पाहून थक्क झालेल्या तिवारींनी जीआरपी आणि आरपीएफच्या मदतीने वृद्धाला ससून रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला, भुसावळ येथून वृद्धाचे कुटुंबीय आले अन् त्यांना घेऊन गेले.

पुणे रेल्वेस्थानकावर कार्यरत असलेले उपस्टेशनमास्तर अनिलकुमार तिवारी 'फादर्स डे'च्या दिवशी पुणे रेल्वेस्थानकात आपल्या नियमित कामासाठी हजर झाले. त्या वेळी त्यांना ओळखीतील प्राणिमित्र संकेत मोरे यांचा कॉल आला. मोरे यांनी पुणे रेल्वेयार्डात एक वृद्ध जखमी अवस्थेत पडल्याची माहिती तिवारी यांना दिली. माहिती मिळताच तिवारी घटनास्थळी गेले. वृद्धाची अवस्था पाहिल्यावर त्यांनी लोहमार्ग पोलिस उपनिरीक्षक मिलिंद झोडगे यांना याबाबतची माहिती दिली. झोडगे यांना माहिती मिळताच तेही घटनास्थळी हजर झाले. त्यांनी लगेचच वृद्धाला ससून रुग्णालयात पाठविले. यानंतर सदरील वृद्धाची माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना कळविले. वृद्धाच्या कुटुंबीयांना दिलेल्या माहितीमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी नेले. दरम्यान, वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी होती, रेल्वेकडून त्याच्यावर उपचार करण्यात आले व त्याला पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.

याबाबत स्टेशनमास्तर तिवारी दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, माहिती मिळाल्यावर आम्ही रेल्वेयार्डात पोहचलो. वृद्ध व्यक्तीच्या पायाला मोठी जखम झाली होती. येथील सर्वांना सुरुवातीला ही व्यक्ती भिकारी असल्यासारखे वाटले. मात्र, ती व्यक्ती सेवानिवृत्त स्टेशनमास्तर होती. त्यांना स्मृतिभ्रंश आजार असल्यामुळे भुसावळवरून रेल्वेनेच पुण्यात आले होते. पुणे रेल्वेस्थानकावरील लोकलमध्ये चढून ते यार्डात पोहचले. त्यानंतर त्यांची आम्हाला माहिती मिळाली.

रेल्वे अधिकार्‍यांनी केले कौतुक

पुणे रेल्वेयार्डात जखमी वृद्धाला तिवारी यांनी केलेल्या मदतीचे, त्यांनी दाखविलेल्या माणुसकीबद्दल त्यांचे रेल्वेवर्तुळात कौतुक होत आहे. त्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना देखील मिळाली. हे समजताच या प्रशंसनीय कामाबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बि—जेशकुमार सिंग आणि इतर अधिकार्‍यांनी तिवारी यांचे कौतुक केले.

'फादर्स डे'च्या दिवशी मी कामावर आलो तेव्हा मला याची माहिती मिळाली. मी तत्काळ घटनास्थळी जाऊन या वृद्ध व्यक्तीला सर्वतोपरी मदत केली. मदत करताना मला वृद्धाची अवस्था पाहून खूप वाईट वाटले. मात्र, मी एक सांगू इच्छितो की, लहानपणापासून आपल्याला सांभाळलेल्या अशा ज्येष्ठ व्यक्तींना कोणीही वार्‍यावर सोडू नये, त्यांनी आपल्यासाठी खूप खस्ता खाल्लेल्या असतात. म्हातारपणी त्यांना तुमची खरी गरज असते. त्यामुळे कोणीही तरुणाने आपल्या आई-वडिलांना असे वार्‍यावर सोडू नये, त्यांची सेवा करावी.

– अनिलकुमार तिवारी, उपस्टेशनमास्तर, पुणे रेल्वेस्टेशन

हेही वाचा

  • 'नीट' गोंधळाविरोधात 'आप' देशभर आंदोलन करणार : संदीप पाठक
  • Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनावेळी भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
  • मनोज जरांगेंसाठी रेड कार्पेट, आमची साधी दखल नाही : लक्ष्मण हाके

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news