कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेलवर कारवाई; बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेलवर कारवाई; बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव पार्क येथील गल्ली क्र. सातमधील संगमवाडी टी. पी. स्किममधील अनधिकृत दोन हॉटेलसह अन्य व्यावसायिक शेड्स आणि क्रिकेट टर्फच्या शेडवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे 50 हजारांहून अधिक चौरस फुटांचे क्षेत्र रिकामे करण्यात आले. विशेष म्हणजे व्यावसायिकांनी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याची स्थगिती उठताच महापालिकेने ही कारवाई केली आहे.

कोरेगाव पार्क येथील सात नंबर लेनमधील भूखंडावर हॉटेल 'चूल मटण', हॉटेल 'बारबंका कॅफे किचन', 'पालमोको डाईन', ड्रिंक, डान्स,' 'पूजा फ्रूट अ‍ॅन्ड व्हेजिटेबल,' 'लजिज चिकन सेंटर,' 'मसल बार जिम'सह क्रिकेट टर्फ शेड उभारण्यात आले होते. अर्धवट बांधकाम आणि पर्त्यांचे शेड उभारताना महापालिकेची परवानगी घेतलेली नव्हती. महापालिकेने येथील व्यावसायिकांना यापूर्वीच नोटीस दिली होती. त्याविरोधात व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेत स्थगिती आदेश मिळविला होता.

न्यायालयाने नुकतेच ही स्थगिती उठविल्यानंतर महापालिकेने बुधवारी सकाळीच जेसीबी, जॉ कटरसह मोठ्या मनुष्यबळाच्या साहाय्याने कारवाईला सुरुवात केली. या वेळी व्यावसायिकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतु महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी पोलिस बंदोबस्तामध्ये सुमारे 50 हजार चौ. फुटांहून अधिकचे बांधकाम आणि शेड पाडले.

येथील हॉटेल व्यावसायिकांनी अग्निशमन दलाची परवानगी घेतलेली नव्हती. पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने येथे येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वाहतुकीची कोंडीदेखील होत होती. यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते.
याविरोधात तक्रारी आल्यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली. महापालिकेच्या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पुढील काळात येथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

पोलिस बंदोबस्त देण्यास टाळाटाळ

महापालिकेच्या बांधकाम विभागाचे पथक यंत्रसामग्रीसह सकाळीच कोरेगाव पार्क येथे हजर झाले, परंतु कोरेगाव पार्क पोलिसांकडून त्यांना पोलिस बंदोबस्त देण्यास विलंब झाला. अखेर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर बंदोबस्त उपलब्ध करून दिला गेला, अशी माहिती महापालिकेतील कर्मचार्‍यांनी दिली.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news