खेड विधानसभा मतदारसंघात वाढदिवसानिमित्त चढाओढ

खेड विधानसभा मतदारसंघात वाढदिवसानिमित्त चढाओढ
Published on
Updated on

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना खेड तालुक्यात नवा टि्वस्ट समोर आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवसेना नेते आणि खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांना विधानसभेसाठी विजयी शुभेच्छा दिल्याने खेडच्या राजकारणात जाणकार असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिलबाबा राक्षे यांनी या जाहीर शुभेच्छा देताना, आपण मात्र पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे सांगितले. याशिवाय लोकसभेला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ घड्याळाच्या व्यासपीठावर मोहिते यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या माजी उपसभापती राजूशेठ जवळेकर यांनीही तशाच शुभेच्छा देताना, आपण अमोल पवार यांचे प्रचारप्रमुख म्हणून काम करू, असे सांगितले. टोकाचे मतभेद चव्हाट्यावर आले; मात्र तरीही आढळराव यांच्यासाठी लोकसभेच्या प्रचारात मोहितेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या माजी सभापती भगवान पोखरकर यांनीही अमोल पवार यांना विधानसभेसाठी पाठिंबा दर्शविला.

लोकसभेच्या निकालापूर्वीच विधानसभा इच्छुकांची तयारी

लोकसभेचा निकाल चार दिवसांवर आलेला असताना आणि विधानसभेला काही महिने बाकी असताना खेड तालुक्यात इच्छुकांना विधानसभेचे वेध लागले आहेत. बुधवारी (दि. 29) राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांचा वाढदिवस वेगवेगळ्या ठिकाणी धूमधडाक्यात साजरा झाला. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी इकडचे कार्यकर्ते तिकडेही पाहायला मिळाले. त्यामुळे लोकसभेचा निकाल काय लागणार? याचे आडाखे बांधले जात असताना खेड तालुक्यात विधानसभेतही 'याला गाड-त्याला गाड' अशी जत्रा भरवण्याची कार्यकर्त्यांची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी तीव्र इच्छुक असलेले सुधीर मुंगसे यांनी अमोल पवार यांना शुभेच्छा देताना आघाडीचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी लोकसभेला प्रचारात विरोधकांवर टीका करून धुरळा उडवून दिला. मात्र, लोकसभेचा निकाल लागण्याअगोदरच त्यांनीही विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यांच्या 27 मे रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या होर्डिंग, फ्लेक्सवरून तसे दिसून आले. शिवसेनेचे बाबाजी काळे हे देखील विधानसभेसाठी पहिल्या पायरीवर पाय ठेवून आहेत. एकूण काय तर खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांना थोपविण्यासाठी अपवाद वगळता फिल्डिंग लागल्याचे चित्र उभे राहत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत काय पाहायला मिळते? हे पाहणे तालुक्यातील मतदार जनतेसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news