12 th result : बारावीच्या गुणपत्रिका सोमवारी मिळणार!

12 th result : बारावीच्या गुणपत्रिका सोमवारी मिळणार!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या गुणपत्रिकांचे सोमवारी (दि.3 जून) वाटप करण्यात येणार आहे. 21 मे रोजी बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला होता. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र व तपशिलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयीन अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवारी दि.3 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच दिवशी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे व स्थलांतर प्रमाणपत्रांचे वाटप करायचे आहे. त्यानुसार विभागीय मंडळस्तरावर नियोजन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्चदरम्यान घेण्यात आली. परीक्षेसाठी 14 लाख 33 हजार 371 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 94 हजार 286 विद्यार्थी नापास झाले आहेत. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन निकाल पाहिला आहे, परंतु गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात आता सोमवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रवेशप्रक्रियेला गती येणार

बारावीच्या ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नव्हत्या. त्यामुळे पदवीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना गती मिळाली नव्हती. तसेच कागदपत्रांची तपासणी खोळंबली होती. आता, गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्याने पदवीसह इतर सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला गती येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news