7th khelo India Youth games: जिम्नॅस्टिकमध्ये अनुष्का पाटीलचा डबल धमाका
7th khelo India Youth games
पुणे : रिदमिक प्रकारात पदकांची लयलूट केल्यानंतर सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत मुलींच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राने पदकांचा धडाका कायम राखला. मुंबईच्या अनुष्का पाटीलने सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकून दिवस गाजवला.
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या मुंबईच्या १६ वर्षीय अनुष्काने बुधवारी तर कमाल केली. तिने अनइव्हन बार प्रकारात सुवर्णपदक जिंकले. शिवाय टेबलवॉल्ट प्रकारात ती रौप्यपदकाची मानकरी ठरली. याच प्रकारात मुंबईच्या सारा राऊळ हिने कांस्यपदक मिळवले.
अनइव्हन बार प्रकारात अनुष्काने १०.४३३ गुणांची कमाई करीत सुवर्णपदक जिंकले. अनुष्का ही विशाल कटकदौंड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ९.८३३ गुण घेणारी यजमान दिल्लीची स्नेहा तरिया रौप्यपदकाची मानकरी ठरली. तेलंगणाच्या निशिका अगरवालने (९.७००) कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्राची उर्वी वाघ ९.०६७ गुण घेत चौथ्या क्रमांकावर राहिली.
टेबलवॉल्ट प्रकारात अनुष्काचे सुवर्ण केवळ ०.२३४ गुणांच्या फरकाने हुकले. तेलंगणाच्या निशिका अगरवाल हिने १२.३३४ गुण घेत सुवर्णपदक आपल्या नावे केले. रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या अनुष्काने १२.१०० गुण मिळवले. १६ वर्षीय सारा राऊळने ११.७०० गुण मिळवत कांस्यपदक आपल्या नावे केले. ती महेंद्र बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. साराने आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये कांस्य जिंकले होते.
ऑलिम्पिकमध्ये खेळायचे आहे : अनुष्का पाटील
वयाच्या चौथ्या वर्षापासून जिम्नॅस्टिकचे वेड जोपासलेल्या अनुष्काला देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळायचे आहे. भारताची दीपा कर्माकर आणि अमेरिकेची सुवर्णपदक विजेती शॉन जॉन्सन या तिच्या आवडत्या जिम्नॅस्ट आहेत. अनुष्काचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीस असून आई गृहिणी आहेत. एमजेएफ तसेच खेलो इंडियाकडून तिला आर्थिक साह्य मिळते.
न सांगता कठोर मेहनत घेण्याची तयारी, सरावात सातत्य आणि सतत शिकण्याची तसेच आपले कौशल्य सुधारण्याची वृत्ती ही अनुष्काची खासियत आहे. ती आपल्या खेळाबाबत सिरियस आहे. जास्तीत जास्त सराव करून खेळात सुधारणा करण्याचा तिचा प्रयत्न असतो. अलीकडे हा गुण फार कमी खेळाडूंमध्ये दिसून येतो, असे अनुष्काचे प्रशिक्षक विशाल कटकदौंड यांनी सांगितले.

