जरंडेश्वर कारखान्याला ‘एसीबी’ची नोटीस : संचालक मंडळाची चौकशी

जरंडेश्वर कारखान्याला ‘एसीबी’ची नोटीस : संचालक मंडळाची चौकशी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या लाचलुचपत विभागाकडून (एसीबी) जरंडेश्वर साखर कारखान्याला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. 1990 ते 2010 च्या कालावधीत असलेल्या कारखान्याच्या संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहाराच्या अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे.
संबंधित संचालक मंडळावर आरोप झाला होता. त्या अनुषंगाने काही तक्रारी 'एसीबी'ला प्राप्त झाल्या होत्या. याबाबत तत्कालीन संचालक व संबंधित विभागाकडे चौकशी सुरू आहे. अर्जदार, गैरअर्जदार यांच्याकडून माहिती मागविण्यासाठी ही नोटीस बजावल्याचे 'एसीबी'चे अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले.

संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहाराबाबत डिसेंबर 2021 मध्ये 'एसीबी'कडे काही तक्रारी आल्या होत्या. संबंधित तक्रारीची खातरजमा करून फेब्रुवारी 2022 मध्ये चौकशी करण्याची शासनाकडून परवानगी देण्यात आली होती. तेव्हापासून ही चौकशी सुरू आहे. 'एसीबी'कडून सध्या तत्कालीन संचालक यांची चौकशी सुरू आहे.

'ईडी'च्या कारवाईने जरंडेश्वर कारखाना आला होता चर्चेत

जरंडेश्वर साखर कारखाना हा माजी आमदार शालिनीताई पाटील या चालवत होत्या. त्यावेळी कर्जात बुडालेल्या या कारखान्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, कारखाना लिलाव प्रक्रियेत गेला आणि हा कारखाना गुरू कमोडिटी या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लिलाव प्रक्रियेतून खरेदी केला. अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तीने हा कारखाना घेतल्याचा आरोप यावेळी झाला होता. जरंडेश्वर लिलाव प्रक्रिया बोगस असल्याचा आरोप त्यावेळी शालिनीताई पाटील यांनी केला होता. याच अनुषंगाने त्यांनी न्यायालयाकडे दाद मागितली. न्यायालयाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

यानंतर मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर 'ईडी'ने या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. अजित पवार हे महायुतीमध्ये आल्यानंतर 'ईडी'ने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल करताना त्यामधून त्यांचे नाव वगळल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर आता 'एसीबी' 1990 ते 2010 च्या कालावधीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करीत असली, तरी नव्याने पुन्हा एकदा या कारखान्याची चर्चा सुरू झाली आहे; तर दुसरीकडे 'एसीबी'कडून ही चौकशी नवीन कोणत्याही प्रकरणाची सुरू नसून, पूर्वीच्याच कालावधीतील असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news