आता तिसरीपासूनच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे धडे! असा असेल अभ्यासक्रम | पुढारी

आता तिसरीपासूनच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे धडे! असा असेल अभ्यासक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून जनतेसाठी खुल्या करण्यात आलेल्या तिसरी ते बारावीच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात आता तिसरीपासूनच विद्यार्थ्यांना कौशल्य अभ्यासक्रमाचे धडे देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार, तिसरीपासूनच विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये तिसरी ते आठवीपूर्व व्यावसायिक कौशल्ये आणि नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.

यामध्ये व्यावसायिक शिक्षणांतर्गत, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, कृषी इत्यादी नावीन्यपूर्ण विषय उपलब्ध होणार आहेत. व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी किमान कौशल्ये, तसेच व्यावसायिक ज्ञान संपादन करू शकेल, असेदेखील नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदींनुसार अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये स्तरनिहाय व इयत्तानिहाय क्षमता यांची स्पष्टता आणण्यात आलेली आहे. पहिली ते दहावीसाठी मराठी व इंग्रजी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. सहावीपासून हिंदी, संस्कृतसह अन्य भारतीय व परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. अकरावी-बारावीसाठी दोन भाषांचे शिक्षण निश्चित करण्यात आले आहे. अराखड्यानुसार, गणित व विज्ञान विषयांचे दोन स्तरावरील अभ्यासक्रम विचारार्थ आहेत.

महत्त्वाचे म्हणजे अकरावी-बारावीमध्ये आता कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक शाखांचे बंधन असणार नाही. विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेचे विषय निवडता येतील. उदा. विज्ञान शाखेचा विद्यार्थी वाणिज्य, तसेच कला शाखेचे विषय निवडू शकणार आहे.
शारीरिक शिक्षण व निरामयता हा विषय शालेय अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य भाग ठरविण्यात आला आहे. स्थानिक खेळाला महत्त्व, शाळेत क्रीडा संस्कृती रुजविणे, आनंददायी शिक्षण, मूल्यमापनाची आधुनिक तंत्रे वापरणे यांवर भर देण्यात येणार आहे. बदलत्या जगाची आव्हाने पेलण्यासाठी मानवी मूल्ये, जीवनकौशल्य व नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारे शिक्षण दिले जाईल. आरोग्य, कला, व्यवसाय शिक्षण या विषयांचेही प्रचलित विषयांसोबत महत्त्व वाढवले जाईल. चिकित्सक वृत्ती, विज्ञाननिष्ठ पुराव्यावर आधारित चिकित्सक विचार करण्याची वृत्ती विकसित होईल.

आशयाचे ओझे कमी करून सखोल संकल्पना व महत्त्वाच्या क्षमता मूल्ये कौशल्य विकसित होतील यावर भर आहे. विद्यार्थी स्वतः कृतीतून ज्ञाननिर्मिती करतील. शालांत परीक्षेचे घोकमपट्टी व स्मरणावर आधारित परीक्षा हे स्वरूप बदलून प्राप्त कौशल्यांचे मूल्यमापन करण्यासाठी शालेय संस्कृती, प्रक्रिया व साहाय्यभूत परिसंस्थांची निर्मिती करण्यात येईल. शालेय कार्यपद्धती कशी असावी, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.

काही विषयांचे मूल्यमान मंडळ स्तरावरून आणि काही विषयांचे मूल्यमापन शाळा स्तरावर करण्यात येणार आहे. सत्र पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेवेळी येणारा ताण कमी होईल व परीक्षेसाठी एकाच सत्राचा अभ्यासक्रम असेल. बोर्ड परीक्षांद्वारे मूल्ये आणि स्वभाववृत्तीचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरील गरजा व अभ्यासक्रमांशी सुसंगत अभ्यासक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. संबंधित आराखडा 3 जूनपर्यंत जनतेसाठी खुला ठेवण्यात आला असून, त्यावर अभिप्राय मागविण्यात आल्याचे विद्या प्राधिकरणाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

पारंपरिक कलाप्रकारांचा समावेश

आनंददायी शिक्षणासाठी कलेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक कलाप्रकार, तसेच सांस्कृतिक वारसा असणार्‍या कला यांचा कलेच्या शिक्षणात समावेश केला आहे. आपापल्या भागातील लोककलांचा समावेश करण्याची मुभा कला शिक्षणात दिली आहे. कलानिर्मितीत पर्यावरणपूरक साहित्य वापरणे व त्यातून पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देणे, असा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा

Back to top button