कात्रज परिसरात ओढ्यातून वाहते मैलामिश्रित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

कात्रज परिसरात ओढ्यातून वाहते मैलामिश्रित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील समर्थनगर येथील ओढ्यातून मैलामिश्रित पाणी वाहत आहे. यामुळे पसरलेल्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येबाबत क्षेत्रीय कार्यालय व सांडपाणी विभागाकडे वारंवार तक्रार अर्ज करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गोकूळनगर भागातून येणारा ओढा पॅरामाउंट सोसायटी, मानसरोवर सोसायटी, समर्थनगर भागातून लेक टाऊन सोसायटीलगत आंबिल ओढ्याला मिळतो. या ओढ्यातून ड्रेनेज लाइन टाकण्यात आली आहे. क्षमतेने लहान असलेल्या लाइनला अनेक मोठ्या सोसायट्यांचे ड्रेनेज जोडले आहे.

मात्र, साफसफाईची कामे व्यवस्थित झाली नसल्याने ड्रेनेज लाइन वारंवार तुंबत असून मैलामिश्रित पाणी ओढ्यातून वाहत आहे.
दुर्गंधीसह नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही समस्या भेडसावत आहे. नागरिकांनी याबाबत अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी दिल्या आहेत. ओढ्यातून टाकण्यात आलेली ड्रेनेज लाइन दुरुस्त करावी, तसेच वाहणारे मैलामिश्रित पाणी बंद करावे, अशी मागणी रमेश गरड, सुधाकर अतकरे, विजय राठोड, मुहम्मद इनामदार, रविकुमार शेम्बेवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

समर्थनगर येथील ओढ्यातून मैलामिश्रित पाणी वाहत असल्याची माहिती मिळाली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने तुंबलेल्या ड्रेनेज लाइनची दुरुस्ती करण्यात येईल.

– श्रीकांत निवदेकर, कनिष्ठ अभियंता, ड्रेनेज विभाग. 

हेही वाचा 

Back to top button