पुणे: शनिवारी भल्या पहाटे दाट धुके अन् बोचर्या थंडीत भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी सादर केलेल्या परेडने रोमांच उभे केले. बहार पथसंचलनासह सैन्यदलातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रेही या संचलनात सादर करण्यात आली. दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जन. धीरज सेठ यांनी 77 व्या आर्मी मेळाव्याचे उद्घाटन केले.
गेला महिनाभर पुणे शहरात भारतीय सैन्यदलाच्या 77 व्या वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू होती. आळंदी रस्त्यावरील बॉम्बे मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर याचे उद्घाटन दक्षिण कमांडचे प्रमुख धीरज सेठ यांच्या उपस्थितीत झाले.
पहाटे सहा वाजता कडाक्याच्या थंडीत सैन्यदलाच्या देशभरातील विविध तुकड्या अन् एनसीसीचे विद्यार्थी देखील यात सहभागी झाले होते. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात देशासाठी प्राणांची बाजी लावून लढणार्या सैनिकांसह अधिकारीवर्गाचा या वेळी शौर्यपदक प्रदान करत सन्मान करण्यात आला. त्यानंतर सैन्य दलाने अत्याधुनिक उपकरणांची प्रात्यक्षिके सादर केली.
संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार समारोप
सैन्यदलाच्या या भव्य राष्ट्रीय आर्मी मेळाव्यासाठी देशभरातून सैनिक आले आहेत. या सोहळ्याच्या समारोपाला 15 जानेवारी रोजी सायंकाळी होणार्या कार्यक्रमात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.