पुणे जिल्हा बँकेला 72.73 कोटींचा निव्वळ नफा..! | पुढारी

पुणे जिल्हा बँकेला 72.73 कोटींचा निव्वळ नफा..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (पीडीसीसी) आर्थिक वर्ष 2023-24 अखेर निव्वळ नफा 72.73 कोटी रुपयांइतका झाला असून, अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण (एनपीए) शून्य टक्के आहे. बँकेने गतवर्षाच्या तुलनेत व्यवसायामध्ये 4 हजार 298 कोटी 55 लाख रुपयांइतकी भरीव वाढ केली असून, (22.10 टक्के) सुमारे 23 हजार 752 कोटींची व्यावसायिक उलाढाल झालेली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली. तर चालू वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता 25 हजार कोटींहून अधिक व्यवसायवृध्दीचे उद्दिष्ट बँकेने ठेवलेले आहे.

देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमाकांची व्यावसायिक उलाढाल ही पीडीसीसी बँकेची आहे. बँकेस तरतुदपूर्व नफा 418.32 कोटी रुपये आहे. बँकेने गतवर्ष 2023-24 मध्ये ठेवी, कर्ज, व्यावसायिक उलाढाल, वसुली, स्वनिधी, नफा, नक्तमुल्य, ठेवी, कर्जे, अनुत्पादक कर्ज वसुली अशा सर्वच आघाड्यांवर ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. बँकेचे वसूल भागभांडवल 408.64 कोटी, स्वनिधी 2847.99 कोटी असून, त्यामध्ये अनुक्रमे 22.10 टक्के व 8.08 टक्क्यांइतकी वाढ झालेली आहे. बँकेचे खेळते भांडवल 17 हजार 544 कोटींवरून 20 हजार 614 कोटी झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत 17.44 टक्के वाढ झालेली आहे. बँकेच्या मार्च 2024 अखेर एकूण एनपीए कर्ज 94 कोटी रुपये वसूल झालेले असून, गतवर्षी असलेले ढोबळ एनपीएचे प्रमाण 4.51 टक्क्यांवरून 2.45 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. गतवर्षी म्हणजे मार्च 2023 अखेर बँकेच्या निव्वळ नफा 70.71 कोटी रुपये होता. त्यामध्येही वाढ झालेली आहे.

पीक कर्जाची भरलेली व्याज रक्कम बँक देणार

पीक कर्जाची फक्त मुद्दल रक्कम अदा करून संस्था पातळीवरील सन 2023-24 च्या पीक कर्जाची वसुली करण्यासंदर्भात बँकेने कार्यवाही केली आहे. ज्या सभासदांनी व्याज रक्कम भरून पीक कर्जाची परतफेड केली आहे. त्यांची व्याजाची रक्कम बँकेमार्फत अदा करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने यापूर्वीच घेतला आहे. तसेच सहकारी संस्थांना आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून संस्थांनी शासन येणे दर्शविलेल्या व्याजाची रक्कमदेखील बँकेमार्फत सहकारी संस्थांना अदा करण्यात येणार असल्याचे दुर्गाडे यांनी सांगितले.

तीन लाखांहून अधिक ग्राहकांकडून डिजिटल बँकिंगचा वापर

जिल्हा बँकेच्या एकूण ठेवी 12966.22 कोटी, कर्ज वितरण 10785.99 कोटी रुपये असून, एकूण व्यावसायिक उलाढाल 23 हजार 752 कोटी झाली आहे. बँकेने खरीप-रब्बी हंगामासाठी 2843.58 कोटी पीक कर्ज वितरण केले आहे. त्यामध्ये शेती-शेतीपूरक व्यवसायासाठी 412.14 कोटींचे मुदत कर्ज वितरित करण्यात आले आहे, तर बँकेच्या तीन लाखांहून अधिक ग्राहकांकडून डिजिटल बँकिंग सुविधांचा वापर केला जात असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button