शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी वेळापत्रक जाहीर करा; ‘यूजीसी’चे उच्च शिक्षण संस्थांना निर्देश | पुढारी

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी वेळापत्रक जाहीर करा; ‘यूजीसी’चे उच्च शिक्षण संस्थांना निर्देश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यापीठांनी त्यांचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करावे. वर्षभरात होणार्‍या सर्व उपक्रमांचा, पदवी प्रदानासंदर्भातील तारखांचाही त्यात समावेश असला पाहिजे. उच्च शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष सुरू करणे, परीक्षेचे वेळापत्रक, निकाल जाहीर करणे याबाबतच्या नियोजनाचे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांना दिले आहेत. यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी यासंदर्भातील परिपत्रक जाहीर केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार बिगरव्यावसायिक पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे वर्ग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, तर द्वितीय वर्षाचे वर्ग जुलैच्या तिसर्‍या आठवड्यात सुरू करावे लागणार आहेत.

तसेच सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर करावे लागणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांचे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले होते. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये ते बर्‍याच प्रमाणात पूर्वपदावर आले आहे. या पार्श्वभूमीवर यूजीसीकडून शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू करण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाचे वर्ग सुरू करण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्ष आणि त्या पुढील विद्यार्थ्यांना प्रकल्प, कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) वगैरे लक्षात घेता दोन आठवड्यांची सवलत देता येऊ शकते.
उच्च शिक्षण संस्थांच्या शैक्षणिक वेळापत्रकात शैक्षणिक वर्षातील वर्ग सुरू होणे, परीक्षा, सुट्ट्या, शैक्षणिक सत्राचा शेवटचा दिवस अशी

माहिती दिलेली असते. शैक्षणिक वेळापत्रकामुळे संबंधित सर्व भागधारकांना वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन करणे शक्य होते. त्यामुळे सुनियोजित वेळापत्रक जाहीर केल्याने शैक्षणिक उपक्रम नियोजनानुसार पूर्ण करणे शक्य होते. तसेच अध्ययन, अध्यापन, संशोधनामध्ये गुणवत्तेचा प्रचार होण्यास मदत होते. त्याअनुषंगाने यूजीसीकडून (औपचारिक शिक्षणाद्वारे प्रथम पदवी मान्य करण्यासाठी किमान मानक सूचना) वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

Back to top button