उन्मादी भाजप सरकार उलथवा : महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवारांचे आवाहन | पुढारी

उन्मादी भाजप सरकार उलथवा : महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवारांचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सत्ता ही लोकांचे कल्याण आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असते. मात्र, भाजपप्रणित नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दहा वर्षांत जनतेला फसवण्याचे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले. सत्तेचा उन्माद काय असतो, हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे लोकशाही संपवणारे उन्मादी सरकार उलथवून टाका, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.  महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
यानिमित्ताने समर्थ पोलिस ठाण्याच्या परिसरात आयोजित केलेल्या प्रचार शुभारंभाच्या सभेत शरद पवार बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते सचिन अहिर, आमदार संग्राम थोपटे, आ. अशोक पवार, आ. संजय जगताप, आ. रोहित पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, आहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर आदींसह महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पूर्वी दिलेली आश्वासने गेली दहा वर्षांत पूर्ण केलेली नाहीत. त्यांनी देशातील जनतेला फसवण्याचे व दिशाभूल करण्याचे काम केले. केवळ मोदी व भाजप विरोधात बोलतात म्हणून झारखंड आणि दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांना अटक केली. ममता बॅनर्जींच्या तीन मंत्र्यांना तुरुंगात टाकले. या माध्यमातून भाजप सरकारने उन्माद काय असतो, हे दाखवून दिले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभेची ही निवडणूक नेत्यांच्या हाती नाही तर जनतेने हाती घेतली आहे. ईडी, सीबीआयच्या भीतीने आमदार भाजपासोबत गेले, जनता मात्र महाविकास आघाडीसोबत आहे.
मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था घसरली आहे. विकासाचा दर 6 टक्क्यांवर आहे, असे असताना देशाचा विकास कसा होईल. भाजपच्या जाहीरनाम्यात मोदींचे 48 फोटो आहेत. आपणास लोक विसरतील, या भीतीपोटी मोदींचे फोटो छापण्यात आल्याचा टोलाही चव्हाण यांनी लगावला.  बाळासाहेब थोरात म्हणाले, या वेळची निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे. तीन उमेदवारांच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. डॉ. अमोल कोल्हे कलाकार असले तरी ते तत्त्ववादी आहेत. तेत्त्व व विचार सोडून गेले नाहीत. त्यांची संसदेतील भाषणे संपूर्ण देशाला भावतात. शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा सन्मान राखण्याचे काम महाविकास आघाडी एकत्र येऊन करत आहोत. सचिन अहिर म्हणाले, ही निवडणूक हुकूमशाहीविरोधात लढण्याची आणि लोकशाही टिकवण्याची आहे.

जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

जयंत पाटील यांनी संसदरत्न पुरस्कार तसेच महिलांचा द्रौपदी म्हणून केलेल्या उल्लेखाचा आधार घेत  अलीकडे काही जणांचा तोल जायला लागला, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळत लगावला. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीस मिळालेला प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालची वाळू घसरत आहे. त्यामुळे त्यांचे उमेदवार लवकर जाहीर केले जात नाहीत.  उमेदवार बदलले जात आहेत.  अगदी गोरगरिबांचे अन्न, कपडे, चपलांवर जीएसटी लावून पैसा गोळा करणारे केंद्र सरकार याच पैशातून बड्या घोटाळेबाजांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करत आहे. इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून कंपन्यांकडून खंडणी गोळ करण्यात येत आहे. भ्रष्टाचार करणार्‍यांना  पक्षात सामावून घेतले जात असल्याने सर्वसामान्य जनतेचा भाजपवर राग आहे.

महिलांचा वापर केवळ ’पॉलिटीकल’ टूल म्हणून : अंधारे

भाजप मनुवादी अजेंडा राबवत असून, महिलांचा वापर केवळ ’पॉलिटीकल’ टूल म्हणून केला जात आहे. देशाला माझा परिवार म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवारात मणिपूर, उन्नाव, हाथरसमधील बहिणींचा समावेश नाही का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. जाहिरात ही खोट्या व वाईट गोष्टींची केली जाते, मोदी की गॅरंटी तशीच आहे. जेवढा जास्त भ—ष्टाचार असेल त्याला तेवढे मोठे पद भाजपकडून दिले जाते, असेही अंधारे म्हणाल्या.
कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जाताहेत. जे धमक्या देतात त्यांना माझा मोबाईल नंबर द्या. तुम्ही दिल्लीत ज्यांना घाबरता त्यांच्यासमोर संसदेत मी आणि डॉ. अमोल  कोल्हे जनतेच्या प्रश्नांसाठी ताठ मानेने आवाज उठवतो. आतापर्यंत संस्कार आणि कुटुंबातील निर्णयानुसार मी कधी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, दूध आणि सहकार संस्थांच्या निवडणुकीत लक्ष दिले नव्हते. परंतु यापुढील होणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील.
– सुप्रिया सुळे, उमेदवार, बारामती 
पराभव दिसू लागल्याने विरोधक वैयक्तिक टीका करू लागले आहेत. पाच वर्षांत दिसला नाहीत, विकास केला नाही, नटसम—ाट असे आरोप होत आहेत. नटसम—ाट, कार्यसम—ाट म्हणणे परवडते. पण खोकेसम—ाट, धोकेसम—ाट, पलटीसम—ाट नको. निधी देतो, मते कचा कचा कचा द्या, असे म्हणणे म्हणजे ही सत्तेची मस्ती आहे.
– डॉ. अमोल कोल्हे, उमेदवार, शिरूर.
कसबा पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांना पोलिस आणि प्रशासनाकडून त्रास देण्यात येत होता. गुंडांकडून धमकावण्यात येत होते. तसाच प्रकार आता सुरू झाला आहे. कुठल्याही कार्यकर्त्याला प्रशासनाकडून त्रास झाल्यास त्यांना माझा मोबाईल नंबर द्या, त्यांची रात्र काळी कशी करायची, हे मी पाहातो.
– रवींद्र धंगेकर, उमेदवार, पुणे
हेही वाचा

Back to top button