पुणे : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवरायांचे राज्यातील 11 त्याचबरोबर तामिळनाडू राज्यातील एक अशा एकूण 12 किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या (युनेस्को) यादीत समावेश करण्यात येणार आहे. याबाबत युनेस्कोच्या अधिकार्यांनी सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे येथील गडकिल्ल्यांवर भेट देऊन पाहणी केली आहे. यासंदर्भात जून महिन्यापर्यंत विस्तृत आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने सुरुवात केली आहे.
त्यानुसार गडकिल्ल्यांच्या आसपासच्या परिसराचा विकास होणार आहे. गडकिल्ल्यांमध्ये आणि परिसरात झालेली खासगी आणि शासकीय अतिक्रमणे काढण्यासंदर्भात प्रथम स्थानिक प्रशासनाने सविस्तर अहवाल तयार करावा, अशा सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली, त्या वेळी या सूचना दिल्या आहेत. राज्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशांचे जतन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने सप्टेंबर 2022 मध्ये युनेस्कोला शासनाच्या वतीने गडकिल्ल्यांसंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. एक वर्षानंतर युनेस्कोकडून 'मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया' या नामांकनाला सहमती देण्यात आली.
17 व्या शतकात बांधलेल्या गडकिल्ल्यांचा वारसा त्यांच्याभोवती असणारी तटबंदी, समृद्ध पाहणीसंदर्भात नियोजन केले.
त्यानुसार केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली 22 अधिकार्यांची समिती स्थापन केली. या समितीमध्ये पुरातत्व विभागाचे अधिकारी, पर्यटन संचलनालयाचे संचालक, सर्व जिल्हाधिकारी आणि विषयतज्ज्ञांचा समावेश आहे. त्यानुसार करीर यांच्या अध्यक्षतेखाली युनेस्कोच्या अधिकार्यांसोबत एक बैठक पार पडल्यानंतर युनेस्कोने प्रत्यक्षात गडकिल्ल्यांची पाहणी केली आहे. त्यानुसार अनेक सूचना देण्यात आल्या.
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आजूबाजूचा परिसर, निसर्गमय वातावरण, वनक्षेत्र आणि पर्यटकांची होणारी गर्दी याचा फायदा घेत अनेक स्थानिकांनी या परिसरात अतिक्रमणे केली आहेत. काही किल्ल्यांमध्ये स्थानिक कुटुंब राहत असून, परिसरात हॉटेल्स व्यावसायिक, निवासस्थाने आदी अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात आहेत.
छत्रपती श्रीशहाजी महाराजांपासून छत्रपती श्रीशिवाजी महाराज आणि छत्रपती श्रीसंभाजी महाराजांचा तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यांपर्यंतचा इतिहास आहे. त्या दृष्टीने या किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर भारतातून प्रथमच 12 किल्ले सहभागी करण्यात आले आहेत. यापूर्वी राजस्थानमधून सहा किल्ल्यांसाठी नामांकन पाठविण्यात आले आहे. संपूर्ण देशासाठी ही गौरवास्पद बाब असून, त्या दृष्टीने युनेस्कोच्या सूचनांनुसार प्रशासकीय पातळीवर 'जिल्हास्तरीय नियोजनबद्ध व्यवस्थापन आराखडा' सूक्ष्मरीत्या करण्यात येईल.
– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी, पुणे
हेही वाचा