उन्हाळी सुटी लागेपर्यंत विद्यार्थ्यांना अंडी, केळी द्या : प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे स्पष्ट निर्देश

उन्हाळी सुटी लागेपर्यंत विद्यार्थ्यांना अंडी, केळी द्या : प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे स्पष्ट निर्देश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये उन्हाळी सुटी लागेपर्यंत अंडी आणि केळीचा लाभ देण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहारात आता सुटी लागेपर्यंत अंडी आणि केळी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक व 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त माध्यान्ह भोजन देण्यात येते. नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य विकासाकरिता नियमित आहारासोबत अंडी आणि केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणार्‍या, आहार शिजवणार्‍या यंत्रणेमार्फत राबविण्यात यावा.

ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करून आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या दिवशी विद्यार्थ्यांना उकडलेले अंडे किंवा अंडा पुलाव, अंडा बिर्याणी या स्वरूपात संबंधित पदार्थांचा लाभ द्यावा. जे विद्यार्थी शाकाहारी आहेत अथवा अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्या दिवशी नियमित आहारासोबत केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात यावे. विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करून घेण्यात यावी. माहितीची महापालिका आणि नगरपालिका स्तरावर तपासणी करून संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकार्‍यांनी प्रत्येकी दोन महिन्यांनी संबंधित अन्न शिजवणार्‍या यंत्रणांना अंडी आणि फळे यांची रक्कम द्यावी, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news