पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट : शेअर मार्केट, पार्ट टाइम जॉब, टास्क फ्रॉडद्वारे गंडा

पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट : शेअर मार्केट, पार्ट टाइम जॉब, टास्क फ्रॉडद्वारे गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील अकरा जणांना सायबर चोरट्यांनी तब्बल 82 लाख 14 हजार 939 रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. शेअर मार्केट, पार्ट टाइम जॉब, टास्क फ्रॉड, महावितरण, बँकेतून बोलतो, अशी विविध प्रलोभने आणि भीती दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. पौड रोड कोथरूडमधील एका 82 वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी 7 लाख 67 हजार 620 रुपयांचा गंडा घातला. एम.एन.जी.एल. गॅसचे बिल भरण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगून बँकेतून बोलतोय, असे भासवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी फिर्यादींचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना क्विक ट्रान्स्फर, एनीडेस्क, शेअर रिमोट कंट्रोल आणि एस.एम.एस. फॉरवर्ड नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करून घेण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादींचे क्रेडिट कार्ड आणि बँक खात्याची माहिती घेऊन ही फसवणूक करण्यात आली आहे. संबंधित अ‍ॅप आपण डाऊनलोड करून घेतली, तर सायबर चोरट्यांकडे आपल्या मोबाईलचा ताबा जातो.
दुसर्‍या घटनेत डीपी रोड कोथरूडमधील 40 वर्षीय महिलेला टास्क फ्रॅाडद्वारे पार्ट टाइम नोकरीचे प्रलोभन दाखवून 2 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादींना आपल्या जाळ्यात खेचले. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तिसर्‍या घटनेत महावितरणमधून बोलत असल्याचे सांगून वीजबिल भरले नसल्यामुळे तुमचे कनेक्शन कट करण्यात येईल, अशी भीती दाखवत हिंगणे खुर्दमधील 59 वर्षीय व्यक्तीची 11 लाख 6 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्यांनी फिर्र्यादींना व्हॉटस्अ‍ॅपद्वारे संपर्क करून ऑगस्ट महिन्याचे वीजबिल भरलेले नाही, अशी बतावणी करण्यात आली. जर तुम्ही बिल भरले नाही, तर तुमचे कनेक्शन कट करण्यात येईल, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादींच्या बँक आणि डेबिट कार्डची माहिती घेऊन ही फसवणूक केली आहे.

चौथ्या घटनेत टिंगरेनगरमधील 54 वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 15 लाख 13 हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने हा गंडा घातला आहे. खराडी चंदनगरमधील 27 वर्षीय तरुणीला पार्ट टाइम जॉब फ्रॅाडद्वारे 3 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. टेलिग्राम आयडी आणि इन्स्टाग्राम पेजला लाईक केल्यास पैसे प्राप्त होतील, असे सांगून ही फसवणूक केली आहे. तसेच, सोमनाथनगर वडगाव शेरीमधील 44 वर्षीय महिलेची शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी 27 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामद्वारे संपर्क साधून ही फसवणूक केली आहे.

हांडेवाडीतील 36 वर्षीय तरुणाला पार्ट टाइम नोकरी आणि टास्क फ्रॅाडद्वारे पाच लाख दोन हजार रुपयांची सायबर ठगांनी फसवणूक केली आहे. मोबाईलवर संपर्क करून आरोपींनी फिर्यादीला आपल्या जाळ्यात खेचले. त्यानंतर पैसे मिळतील, असे सांगून त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, शिवनेरीनगर कोंढव्यामधील 44 वर्षीय व्यक्तीलादेखील अशाच प्रकारे गंडा घालण्यात आला आहे. त्यांची टास्क फ्रॅाडद्वारे एका लाईकवर दीडशे रुपये भेटणार, असे सांगून 1 लाख 73 हजारांची फसवणूक केली आहे. मॅजेस्टिक पार्क उंड्रीतील 24 वर्षीय तरुणाला शेअर मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने एक लाखाचा गंडा घातला आहे. तसेच, एनआयबीएम रोड कोंढवामधील 36 वर्षीय तरुणाचीदेखील शेअर मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने 2 लाख 30 हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

44 वर्षीय महिलेची 4 लाखांनी फसवणूक

ससाणेनगर हडपसरमधील 44 वर्षीय महिलेची टास्क फ्रॉडच्या माध्यमातून 4 लाख 72 हजारांची फसवणूक केली आहे. सुरुवातीला पाच हजार रुपये महिलेकडून सायबर चोरट्यांनी भरून घेतले. त्यानंतर त्यांना कामाचा काही मोबदलादेखील दिला. मात्र, त्यानंतर आपल्या जाळ्यात खेचून त्यांनी महिलेकडून 4 लाख 72 हजार रुपये आपल्या खात्यावर भरून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news