महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद; हजारो महिलांचा ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या बाईक रॅलीत सहभाग

महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद; हजारो महिलांचा ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या बाईक रॅलीत सहभाग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'स्त्रीशक्तीचा विजय असो', 'जय भवानी, जय शिवाजी', 'स्त्रीशक्तीला सलाम'… असा दुमदुमलेला जयघोष… मराठमोळ्या वेशभूषेत बाईक चालविणार्‍या उत्साही महिला अन् विविध क्षेत्रांतील महिलांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग… महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद करणार्‍या महिलांच्या भव्य बाईक रॅलीचा जल्लोष रविवारी (दि. 7) पाहायला मिळाला. दै. 'पुढारी' आणि 'पुढारी कस्तुरी क्लब'तर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले अन् या बाईक रॅलीत सुमारे दोन हजारांहून अधिक महिलांनी सहभागी होत 'हम किसीसे कम नहीं' हे दाखवून दिले. या रॅलीतून स्त्रीशक्तीला सलाम करण्यात आला.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत आणि इन असोसिएशन विथ वीणा वर्ल्ड आयोजित या महिला भव्य बाईक रॅलीचा आवाज सगळीकडे दुमदुमला. रॅलीचे ज्वेलरी पार्टनर सेन्को गोल्ड अँड डायमंड्स आणि एनर्जी पार्टनर कात्रज डेअरी हे होते. कोणी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले, तर कोणी जीन्स-कुर्ता या वेशभूषेत सहभागी झाले. महिलांचा उत्साह काही औरच होता. आयटी क्षेत्रातील नोकरदार असो वा डॉक्टर… गृहिणी असो वा वकील… अशा विविध क्षेत्रांतील महिलांनी रॅलीत सहभागी होत स्त्री सक्षमीकरणाचा नारा बुलंद केला. एकीकडे पारंपरिकतेचा साज आणि दुसरीकडे आधुनिकतेची कास, असे चित्र या वेळी पाहायला मिळाले.

गर्जना ढोल पथकाच्या वादनाने रॅलीत रंग भरला. त्यानंतर केशव शंखनाद पथकाच्या शंखनादाने वेगळेच वातावरण निर्मिले. दैनिक 'पुढारी कस्तुरी क्लब'च्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी महिलांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. स्मितादेवी जाधव आणि स्वारगेट विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या हस्ते फ्लॅगऑफ करून रॅलीला सुरुवात झाली. 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेतील मुख्य नायक अक्षर कोठारी, मुख्य नायिका ईशा केसकर, कात्रज डेअरीचे चेअरमन भगवान पासलकर, व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये, वीणा वर्ल्डचे श्रद्धा मांडके, ओंकार शिंदे, सेन्को गोल्ड अँड डायमंड्सचे ओंकार पैठणकर हे प्रायोजकही रॅलीत सहभागी झाले. रील्सस्टार पवन वाघुलकर हेही उपस्थित होते.

रॅलीला सकाळी साडेआठ वाजता सारस

बागेजवळील मित्रमंडळ चौक येथील दै. 'पुढारी'च्या कार्यालयापासून प्रारंभ झाला. महिलांनी घोषणा देत अन् आत्मविश्वासाने बाईक चालवत रॅलीत उत्साहपूर्ण सहभाग घेतला. गुढी हातात घेऊन मराठी नववर्षाच्या शुभेच्छांचीही देवाण-घेवाण झाली. बाजीराव रस्ता, शनिवारवाडा, पुणे महापालिका, शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, टिळक रस्ता, शास्त्री रस्तामार्गे श्री महालक्ष्मी मंदिर या मार्गाने रॅलीची सकाळी साडेनऊ वाजता दैनिक 'पुढारी' कार्यालयाजवळ सांगता झाली.

बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांना वीणा वर्ल्डकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या तसेच लकी ड्रॉही काढण्यात आला. सेन्को गोल्ड अँड डायमंड्सकडूनही गिफ्ट कूपन देण्यात आले. ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरकडून वैद्यकीय सेवा आणि अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा पुरविण्यात आली. पुणे वाहतूक पोलिसांचेही रॅलीला सहकार्य मिळाले.

सादरीकरणाने भरले रंग

गर्जना डोल पथकाच्या वादनाने रॅलीत रंग भरला. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट वादनावर महिलांनीही थिरकण्याचा आनंद घेतला. एन ग्रेड अ‍ॅकॅडमीतर्फे तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. केशव शंखनाद पथकाकडून शंखनाद करण्यात आला. अशा उत्कृष्ट सादरीकरणाने रॅलीत रंगत आणली.

सेल्फीचा उत्साह

आकर्षक रंगांच्या नऊवारी साड्या, पारंपरिक अलंकार, नथ, चंद्रकोर असा साजशृंगार करीत महिला रॅलीच्या ठिकाणी उपस्थित होत्या. कलाकारांबरोबर, मैत्रिणींबरोबर सेल्फी घेत या वेळी मोबाईलचा क्लिकक्लिलाट केला.

रॅलीत महिलांनी वेधले सर्वांचे लक्ष

कोणी झाशीची राणी लक्ष्मीबाईची वेशभूषा केली होती, तर कोणी श्री विठ्ठलाची. महिलांनी रॅलीदरम्यान 'वसुंधरा वाचवा'चा संदेशही दिला. तसेच, काही महिलांनी गुढी हातात घेऊन गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या. रॅलीत काही दिव्यांग महिलांनीही सहभागी होत स्त्रीशक्तीचा नारा बुलंद केला.

कलाकारांनी साधला संवाद

कलाकार अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांचा सहभाग रॅलीत होता आणि या कलाकारांनी महिलांशी मनमोकळा संवाद साधला. महिलांचा उत्साह पाहून तेही आनंदित झाले. कलाकारांनी महिलांसोबत सेल्फीही क्लिक केले.

'आम्ही भारताचे नागरिक प्रतिज्ञा करतो की, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करू,' अशी शपथ बाईक रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी घेतली. पुणे महापालिकेच्या अधिकारी संपदा काळे आणि अमोल लावंड या वेळी उपस्थित होते. त्यांनी दिलेली शपथ महिलांनी घेतली आणि यंदा मतदान करण्याचा निर्धारही केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news