Loksabha election 2024 : कडक तापमानाचा प्रचाराला फटका | पुढारी

Loksabha election 2024 : कडक तापमानाचा प्रचाराला फटका

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता सुरू व्हायला सुरुवात झाली असून, निवडणूक प्रचारासाठी एलईडी स्क्रीन असलेली वाहने गावागावांत चित्रफितीद्वारे प्रचार करताना दिसत आहेत. मात्र, ऐन एप्रिलच्या कडक उन्हाच्या चटक्यामध्ये एकीकडे शेतकरी कांदा काढणीच्या कामात व्यस्त असताना गावात दुपारी चित्रफीत पाहण्यासाठी उपस्थित मतदारांकडूनही पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पिंपरखेड (ता. शिरूर) येथे मंगळवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचे एलईडी स्क्रीन असलेले वाहन चौकात उभे राहिले. या वेळी उमेदवाराच्या मागील पाच वर्षातील केलेल्या कामगिरीची चित्रफीत एलईडी स्क्रीनवर सुरू होती. भरदुपारी कडक उन्हाच्या चटक्याने आणि कडक असहाय्य झळांनी अंगाची काहिली होत असल्याने कडक उन्हात चित्रफीत पहाण्याकडे उपस्थित असलेल्या नागरिकांनी पाठ फिरवली.

कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून कडक उन्हाळ्याची चाहूल लागली असताना शेतकरी दिवसभर कांदा पिकाची काढणी करण्यात व्यस्त आहेत. अशावेळी लोकसभा निवडणूक उमेदवारांच्या कामाची चित्रफीत दाखवणारी एलईडी स्क्रीन प्रचाराची वाहने गावातील गावठाणात पहायला मिळत आहेत. शेतकरी शेतीकामात व्यस्त असल्याने या प्रचाराकडे शेतकर्‍यांचे सध्या दुर्लक्ष असून निवडणूक मैदानात उतरलेल्या उमेदवारांना थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊनच प्रचार करावा लागणार असे दिसते.

हेही वाचा

Back to top button