शिवरायांच्या कवड्यांचा आता जगात डंका; मिळालं जीआय मानांकन | पुढारी

शिवरायांच्या कवड्यांचा आता जगात डंका; मिळालं जीआय मानांकन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांना प्रिय असलेल्या कवड्यांना प्रथमच जीआय मानांकन मिळाले आहे. तुळजापूर हे गाव कवड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र त्याचे ‘कवड्यांचे गाव’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच मानांकन झाले आहे. त्यासह लातूरची भोसरी डाळ, काष्टी कोथिंबीर, कुंथलगिरीचा खवा, जालन्याची दगडी ज्वारी, पेणच्या गणपती मूर्तींनाही हे मानांकन सोमवारी जाहीर झाले.
सोमवारी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 40 पैकी 22 मानांकने पुणे येथील गणेश हिंगमिरे यांची असून महाराष्ट्रातील 13 मानांकनाचा यात समावेश आहे. यातील कवड्यांना मिळालेले मानांकन खूप महत्त्वाचे आहे. कारण छत्रपती श्रीशिवाजी महाराजांना कवड्यांची माळ प्राणप्रिय होती. पुणे शहरातील अ‍ॅड. गणेश हिंगमिरे हे आंतरराष्ट्रीय पेटंट विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी आजवर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांना 38 जीआय मानांकन मिळवून
दिले आहेत.

यांना मिळाले मानांकन

1) तुळजापूरच्या कवड्या
2) लातूरची पानचिंचोली चिंच
3) भोसरी डाळ, लातूर
4) काष्टी कोथिंबीर, लातूर
5) दगडी ज्वारी, जालना
6) कुंथलगिरी खवा, धाराशिव
7) पेणचे गणपती
8) बहाडोली जांभूळ
9) बदलापूर जांभूळ

कवड्यांची माळ ऊर्जेचा स्रोत

इतक्या सर्व उत्पादनांत कवड्यांची माळ हा विषय महाराष्ट्रासाठी भावनिक अन् जवळचा आहे. कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिव्हाळ्याचा आहे. मराठवाड्यातील तुळजापूरला आई तुळजाभवानीचे मंदिर आहे. तेथे कवड्यांच्या माळा मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातात. कवडी हा आयुर्वेदिक वनस्पतीचा प्रकार आहे. त्यात प्रचंड ऊर्जा असल्यानेच ती माळ रूपाने राजे गळ्यात धारण करीत. त्याला सोन्यापेक्षा जास्त महत्त्व त्या काळात होते, अशी माहिती अ‍ॅड. हिंगमिरे यांनी दिली.

गावाच्या बौद्धिक संपदेची, वैशिष्ट्यांची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर होते ती जीआय मानांकनमुळे. यात कवड्यांची माळ हा विषय महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण शिवचरित्रात त्याचा उल्लेख ठायी ठायी आढळतो.

– अ‍ॅड, गणेश हिंगमिरे, आंतरराष्ट्रीय पेटंट तज्ज्ञ, पुणे

हेही वाचा

Back to top button