शेतकर्‍याने रंगेहाथ पकडले केबलचोर; एकलहरे शिवारातील प्रकार | पुढारी

शेतकर्‍याने रंगेहाथ पकडले केबलचोर; एकलहरे शिवारातील प्रकार

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील एकलहरे शिवारातील एकलहरे-टिळकनगर रस्त्याच्या कडेला शेती महामंडळाच्या पडित क्षेत्रात भल्या सकाळी केबल चोरट्यांना येथील शेतकर्‍याने केबल जाळताना रंगेहाथ पकडले. मात्र चोरट्यांनी सदर शेतकर्‍याला दमदाटी देत घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून तपासाची चक्रे फिरवली आणि काल संध्याकाळी एका संशयिताला ताब्यात घेतले. पुढील तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी, की काल रविवारी भल्या सकाळी टिळकनगर-एकलहरे रस्त्याच्या महामंडळाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काळकुट धूर निघत होता.

एकलहरे येथील शेतकरी सदर रस्त्याने आपल्या शेतात मोटार चालू करण्यासाठी जात असताना ही बाब शेतकर्‍याच्या निदर्शनास आली. शेतकर्‍याने घटनास्थळी जाऊन बघितले असता, सदर चोरटे चोरलेल्या केबल जाळून, कॉपर तार काढत असल्याचे दिसले. केबलमधील या तांब्याची तार विकून चोरटे पैसे कमावतात. सदर शेतकर्‍याने चोरट्यांना याबाबत हटकले असता, चोरट्यांनी शेतकर्‍याला दमदाटी करत घटनास्थळावरून लगेच धूम ठोकली. सदर शेतकर्‍याने लगेचच बेलापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

सदर क्षेत्रात ठिकठिकाणी केबल जाळून त्यामधील तार काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाल्याने, सदर घटनेने मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याचे पोलिसांकडून सांगितले गेले आहे. पोलिसांना सदर जागेवरून वीस ते तीस किलो कॉपर तारेचा साठा जाळलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. एकलहरे, उक्कलगाव, बेलापूर शिवारातील सातत्याने शेतकर्‍यांचे वीजपंप व केबलचोरीचे प्रकार समोर आले. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. या चोर्‍यांमुळे शेतकरी हतबल झाला आहे, तर पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही चोरट्यांचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र कालच्या घटनने येथील शेतकर्‍यानेच चोरीचा तपास लावला आहे.

दरम्यान, सदर चोराबाबत पोलिसांना सखोल माहिती दिली असून त्यापैकी एक चोर स्थानिक असल्याचे संबंधित शेतकर्‍याने पोलिसांना सांगितले. परिसरातील शेतकर्‍यांनी चोरट्यांचा तत्काळ शोध लावण्याची मागणी केली आहे. काल सदर घटनेनंतर एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव येथील शेतकर्‍यांनी बेलापूर पोलिस ठाण्यात धाव घेत आपल्या चोरीला गेलेल्या मोटारी, केबलसह अन्य वस्तूबाबत तक्रारी दिल्या.

एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव क्षेत्राच्या परिसरातील शेतकर्‍यांसाठी रात्र वैर्‍याची ठरत आहे. येथील शेतकर्‍यांचे विद्युतपंप, केबल, स्टार्टरवर चोरटे डल्ला मारीत आहेत. यामुळे रात्री सुरू असलेला पंप सकाळी शाबूत असण्याची खात्री नाही. आमचा हजारोंचा वीजपंप व केबल चोरट्यांनी चोरून नेला आहे. उन्हाची वाढती तीव्रता, पिकांची पाण्याची गरज भागविताना होणारी दमछाक व चोरीची घटना यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोर चोरी करीत आहेत. पोलिसांनी गस्त वाढविण्याबरोबर चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे बनले आहे.

– सचिन थोरात, शेतकरी, उक्कलगाव

हेही वाचा

Back to top button