जलवाहिनीची खोली एक ते दोन फूट; मलिदा खाण्यासाठी जलजीवन योजना | पुढारी

जलवाहिनीची खोली एक ते दोन फूट; मलिदा खाण्यासाठी जलजीवन योजना

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : हिंगणेवाडी (सणसर, ता. इंदापूर) येथील जलजीवन मिशन योजनेच्या पाइपलाइनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, ठेकेदाराने एक ते दोन फूट खोलीवर पाइपलाइन केली आहे. ही जलजीवन योजना केवळ मलिदा खाण्यासाठी राबवली जात आहे का? असा सवाल हिंगणेवाडी येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. हिंगणेवाडी परिसरातून उद्धट प्राधिकरण संजीवनी योजनेचे काम चालू असताना हिंगणेवाडी येथील जलजीवन योजनेची पाइपलाइन फुटली होती. पाइपलाइन फुटलेल्या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी जुनी पाइपलाइन खोदून बाहेर काढण्यात आली. त्या वेळी पाइपलाइनची खोली एक ते दोन फुटांपर्यंत असल्याचे दिसून आले.

वास्तविक, जलजीवन योजनेच्या पाइपलाइनची खोली ही अंदाजपत्रकामध्ये तीन फुटांच्या पुढे आहे. परंतु, या ठिकाणी जलजीवन योजनेच्या पाइपलाइनचे झालेले काम हे पूर्णपणे निकृष्ट पद्धतीने झाले असून, केवळ एक ते दोन फूट खोलीवरच पाइपलाइन गाडण्यात आलेली आहे. हिंगणेवाडी ते घोलपवाडी या रस्त्याच्या बाजूने या जलजीवन मिशन योजनेच्या पाइपलाइनचे काम करण्यात आले आहे. अगदी रस्त्यालगत पाइपलाइन असल्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करताना किंवा साइडपट्टीचे काम करताना या पाइपलाइनचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

या योजनेसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. पाइपलाइनची खोली कमी असल्यामुळे व रस्त्याच्या जवळून पाइपलाइन गेल्याने रस्त्यावरून अवजड वाहने जाताना देखील पाइपलाइन फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाणार आहे. संबंधित ठेकेदाराने हिंगणेवाडी जलजीवन मिशन योजनेच्या पाइपलाइनची खोली अंदाजपत्रकाप्रमाणे करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

हिंगणेवाडी जलजीवन योजनेच्या पाइपलाइनचे अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालेले नसून, काम केवळ मलिदा खाण्यासाठीच केलेले आहे. ही योजना पूर्णपणे चुकीची आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून, चुकीच्या पद्धतीने काम चालल्याने निधी पूर्णपणे वाया जाणार आहे. या योजनेच्या कामाकडे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केलेले आहे. ठेकेदाराने पाइपलाइनचे केलेले काम अंदाजपत्रकाप्रमाणे करून द्यावे; अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल

– श्रीनिवास कदम, माजी उपसरपंच, सणसर

हेही वाचा

Back to top button