Success Story ! सासूचे कष्ट व सुनेची जिद्द; शीतल शिंदे ग्राम महसूल अधिकारीपदी | पुढारी

Success Story ! सासूचे कष्ट व सुनेची जिद्द; शीतल शिंदे ग्राम महसूल अधिकारीपदी

वाडा : पुढारी वृत्तसेवा : वाढती बेरोजगारी व महागाई या सगळ्या संकटांना तोंड देत वाडा येथील सासूने आपल्या सुनेसाठी दिवस-रात्र कष्ट करून सुनेला ग्राम महसूल अधिकारी बनविले. नुकत्याच झालेल्या ग्राम महसूल अधिकारीपदी वाडा गावची सून शीतल भूषण शिंदे यांची पुणे येथे निवड झाली. खरंतर या प्रवासात सासू सविता विजय शिंदे यांची भूमिका समाजाच्या दृष्टीने उल्लेखनीय होती. आपल्या सुनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत प्रतिकूल परिस्थितीत बाजारात मासेविक्री करत सविता शिंदे या घरगाडा चालवित. आपल्या सुनेला अधिकारी पाहण्याचे त्यांचे स्वप्न व आत्मविश्वास सुनेसाठी मोठा आशीर्वाद ठरला. शीतल विलास काळे शिंदे यांनी आपले शालेय शिक्षण हे घोडेगाव येथे, तर बारावीचे शिक्षण वाडा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात पूर्ण केले. त्याच दरम्यान त्यांनी डी.एड. पूर्ण केले. शिक्षण सुरू असतानाच त्यांची शिक्षक भरतीत निवड झाली.

दरम्यान, स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांनी 2014पासून सुरू केली होती. सन 2018 मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदाची त्यांची संधी अवघ्या 4 गुणांनी राहिली. त्यानंतर पुन्हा त्यांनी 2020 मध्ये प्रयत्न केले. परंतु पुन्हा एकदा तेच झाले. या काळात शीतल यांच्या सासू सविता यांनी माशांचा व्यवसाय करून सुनेला कुठलीच उणीव भासू दिली नाही. अखेर सन 2023 मध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करून ग्राम महसूल अधिकारीपदी शीतल यांनी आपली निवड सार्थ करून दाखविली. यासाठी वाडा येथील चंद्रशेखर शेटे, रोहिदास शेटे, अरुण कहाणे, लक्ष्मण खानविलकर आदींसह घरातील सर्व व मित्र परिवाराने सहकार्य केले. एकीकडे चूल आणि मुल सांभाळणाऱ्या संस्कृतीत राहिलेल्या सासूने ही सगळी बंधने झुगारून आपल्या सुनेला अधिकारी बनविल्याने वाडा व परिसरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा

Back to top button