पुणे : पुढारी वृत्तसेवा : ललित पाटील मूळचा नाशिकचा. उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यापासून ते अनेक प्रकारचे व्यवसाय केले. मात्र, खरी कलाटणी त्याला मिळाली ती मुंबईतील एका पार्टीत. याच पार्टीत त्याला पाच रुपयांचे 500 रुपये करण्याचा फंडा मिळाला अन् ड्रगतस्कर म्हणून ललितचा ड्रगच्या पटलावर उदय झाला. त्यानंतर ड्रग तयार करण्याचा कारखाना थाटण्यापासून ते विक्रीचे रॅकेट तयार करण्यापर्यंत त्याने पाठीमागे वळून पाहिले नाही.
ललितने ड्रगतस्करीचे असे काही जाळे विणले, की पोलिस यंत्रणेला देखील तोंडात बोटे घालावी लागली. मात्र, अखेर कारागृहापासून सुरू झालेला ड्रगनिर्मिती अन् विक्रीचा प्रवास त्याला शेवटी कारागृहापर्यंतच घेऊन गेला. 2019 पूर्वी चाकणच्या अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात अटक होण्याअगोदर ललित मुंबईतील एका पार्टीत गेला होता. नंतर चाकणच्या गुन्ह्यात ड्रगचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यानंतर कारागृहात राहूनही त्याने अरविंदकुमार लोहरे याच्या मदतीने ड्रगतस्करीचे रॅकेट सक्रियपणे चालविल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. ललितची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशीच आहे. खलनायक कारागृहात राहून बाहेर आपले साम्राज्य चालवितो. तो पोलिस यंत्रणेला आपल्या कक्षेत घेऊन बाहेर अॅक्टिव्ह राहतो. तोच फॉर्म्युला ललितने येरवडा कारागृह, ससून रुग्णालय, पंचतारांकित हॉटेलपर्यंत वापरला.
गुन्हे शाखेच्या पथकाने ललितच्या येरवडा कारागृह व्हाया ससून रुग्णालय ड्रगरॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांच्या ताब्यात असतानाच अवघ्या दोन दिवसांत ललितने पोलिसांना हाताशी धरून पळ काढला. त्याच्या पलायनामुळे पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले. शेवटी ललित पोलिसांच्या ताब्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी तत्कालीन पोलिस आयुक्तांनी केली. त्या वेळी त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणार्या एका पोलिस अधिकार्यासह सहा पोलिसांना थेट खात्यातून बडतर्फ केले गेले. कारागृहातील पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना बेड्या पडल्या. याचे लोण ससून रुग्णालयापर्यंत पोहचले. काही डॉक्टरांनाही अटक झाली. विविध सरकारी यंत्रणांना हाताशी धरून ललित ड्रगमाफिया झाला. त्याने आपल्या या धंद्यात मदत घेतली ती भाऊ, प्रेयसी, जवळचा मित्र आणि कारागृहात ओळख झालेल्या आरोपींची. त्यामुळे मुंबईची पार्टी ललितसाठी महत्त्वाची ठरली.
गुन्हे शाखेने ललित पाटील (वय 37) याच्यासह चौदा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करून तब्बल 3 हजार 150 पानांचे दोषारोपत्र नुकतेच दाखल केले आहे. बहुधा अमली पदार्थाच्या गुन्ह्यात मोक्काअन्वये कारवाई करण्यात आल्याचा पहिलाच राज्यातील गुन्हा आहे. ज्या पार्टीने ललितला ड्रग्जमाफिया केले, त्या पार्टीत ललितला मंत्र देणारा 'तो' नेमका कोण? हे मात्र अद्यापही गुलदस्तातच आहे.
हेही वाचा