Pune : कचरा टाकणार्‍यांचे आधी प्रबोधन नंतर कारवाई ! | पुढारी

Pune : कचरा टाकणार्‍यांचे आधी प्रबोधन नंतर कारवाई !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागांत महापालिकेने स्वच्छता केल्यानंतर काही बेशिस्त नागरिक रस्त्यावर व आडोशाला कचरा आणून टाकतात, त्यामुळे दिवसभर रस्त्यावर कचरा दिसतो आणि महापालिकेच्या स्वच्छ मोहिमेवर परिणाम होतो, यासंदर्भात दैनिक ’पुढारी वृत्तमालिका’ प्रसिद्ध केली. या वृत्तमालिकेची दखल घेत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा टाकणार्‍यांचे प्रथम प्रबोधन व नंतर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेंतर्गत आयोजित केल्या जाणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहर गेली अनेक वर्षांपासून सहभाग घेत आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून शहरात स्वच्छतेची कामे केली जात आहेत. नागरी परिसर पहाटे, तर सार्वजनिक ठिकाणे व रस्ते रात्रीच्या वेळी स्वच्छ करून पहाटे सहा सातपूर्वी संपूर्ण कचरा उचलून सर्वत्र स्वच्छता केली जाते. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, लघुशंका करणे, थुंकणे, कचर्‍याचे वर्गीकरण न करणे, कचरा जाळणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, ओला कचरा जिरविण्यासाठी बल्क वेस्ट यंत्रणा कार्यान्वित न ठेवणे आदींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

या प्रक्रियेला गती मिळण्यासाठी स्वच्छतेच्या कामासाठी नवीन वाहने व यंत्रसामग्री घेतली जात आहे. शिवाय कचरा टाकला जाणार्‍या ठिकाणी स्वच्छता करून रांगोळ्या काढल्या जात आहेत. मात्र, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने व क्षेत्रीय कार्यालयांच्या कर्मचार्‍यांनी स्वच्छता केल्यानंतर अनेक बेशिस्त लोकांकडून रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या उद्दिष्टांवर पाणी फेरले जात आहे. यासंदर्भात दैनिक ’पुढारी’ने आठवडाभर वृत्तमालिका प्रसिद्ध केली. या वृत्तमालिकेची दखल घेत महापालिकेच्या घनकचरा विभागाने कारवाईची मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेंतर्गत कचरा टाकला जाणारी ठिकाणी शोधून कचरा टाकणार्‍यांचे प्रथम प्रबोधन केले जाणार आहे, त्यानंतरही तेथे कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने शहरात स्वच्छतेचे विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. कचरा टाकणार्‍या व अस्वच्छता करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पथकांचीही निर्मिती केली आहे. मात्र, सध्या निवडणुकीच्या कामासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती झाल्याने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कारवाई मंदावली आहे. मात्र, लवकरच ही कारवाई तीव— करून कचरा टाकणार्‍यांचे प्रथम प्रबोधन व नंतर कारवाई केली जाणार आहे.

– संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका.

 हेही वाचा

Back to top button