‘राजगड’ जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी सज्ज! प्रशासनाकडून जोरदार तयारी

‘राजगड’ जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी सज्ज! प्रशासनाकडून जोरदार तयारी
Published on
Updated on

खडकवासला : स्वराज्याची पहिली राजधानी असलेला किल्ले राजगड जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी सज्ज झाला आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय मानांकन समिती या किल्ल्याची पाहणी करणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असून, गडाच्या डागडुजीसह ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

गडाच्या पायथ्याशी पाल खुर्द येथील छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या शिवकालीन शिवपट्टण राजवाडा व परिसराच्या विकासाचे कामही सुरू करण्यात आले आहे. शिवपट्टण संवर्धनासाठी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. छत्रपती शिवरायांचे राजपरिवारासह सर्वांत अधिक काळ (25 वर्षे) वास्तव्य असलेला राजगड किल्ला जागतिक वारसास्थळ म्हणून जगभरात पोहचणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत गडाच्या डागडुजीचे काम अडकून पडू नये, यासाठी पुरातत्त्व विभागाने निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्यापूर्वीच प्रशासकीय बाबींची पूर्तता करून गडाच्या डागडुजीसह ऐतिहासिक शिवपट्टण संवर्धनाचे काम सुरू केले आहे. शनिवारी (दि. 23) शिवपट्टण वाड्याच्या चोहोबाजूंच्या तटबंदीच्या अवशेषांची पाहणी करण्यात आली. राजगडावर गाडलेल्या तटभिंतीचे उत्खनन करण्यात येणार आहे.

छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीत राजगड किल्ल्याचे बांधकाम केले. अभेद्य व बळकट डोंगरी किल्ला म्हणून याचा लौकिक आहे. गडाच्या उत्खननात लुप्त तटभिंतीसह सुरक्षा चौक्या, सैन्य निवास, शिवरायांच्या राज सदरेखालील तळघर आदी वास्तू, ठिकाणे उजेडात आली आहेत. पद्मावती माचीवरील तटभिंतीचे मूळ ऐतिहासिक स्वरूपात जतन करण्यासाठी तसेच पाली दरवाजा मार्गाच्या पायर्‍या व इतर ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी आदी कामे करण्यात येणार आहेत.

शिवरायांच्या अप्रकाशित इतिहासाचे पुन्हा दर्शन

काळाच्या ओघात दगड-मातीत गाडलेल्या गडाच्या तटभिंतीचे दर्शन पाच वर्षांपूर्वी डागडुजीचे काम करताना झाले होते. त्यानंतर
आता जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी पद्मावती माचीवरील तळ्यापासून चोर दरवाजापर्यंत तसेच पुढील तटभिंतीच्या डागडुजीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे छत्रपती शिवरायांच्या अप्रकाशित इतिहासाचे पुन्हा दर्शन घडणार आहे.

सप्टेंबर महिन्यात जागतिक वारसास्थळ आंतरराष्ट्रीय मानांकन समिती किल्ल्याची पाहणी करणार आहे. त्यासाठी किल्ल्याच्या आवश्यक डागडुजीसह पद्मावती माचीवरील उर्वरित तटभिंतीची डागडुजी तसेच पाली दरवाजा मार्गावरील पायर्‍यांची दुरुस्ती व इतर कामे करण्यात येणार आहेत.

– डॉ. विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व विभाग

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news