लंकेंच्या एंट्रीनंतर ‘यांची’ होणार इन्कमिंग : कोल्हेंचे विधान चर्चेत | पुढारी

लंकेंच्या एंट्रीनंतर 'यांची' होणार इन्कमिंग : कोल्हेंचे विधान चर्चेत

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडतांना दिसत आहेत. अनेक नेते आपल्या सोईनुसार पक्षबदल करतायत. नेते आपली भूमिका बदलताना दिसतायत. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रावादीचे आमदार निलेश लंके यांचाही समावेश आहे. ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुद्धा रंगू लागली आहे. तसे झाल्यास त्यांना अहमदनगर जिल्ह्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. लंके यांना शरद पवार यांच्या गटात आणण्यासाठी शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

महागाईची होळी

अमोल कोल्हे (24 मार्च) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कात्रज भागात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने होळीचे दहन केले. यावेळी त्यांनी महागाईची होळी पेटवत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. होळी पेटवल्यानंतर होळी रे होळी पुरणाची पोळी, गद्दारांना देऊ निष्ठेची गोळी, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

शरद पवार यांच्याविषयी बोलल्यावरच प्रत्येकजण चर्चेत येतो. त्यामुळेच शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. शरद पवार यांनी गेली 55 वर्षे महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप काही केलं आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यावर टीका केली म्हणजे, या कामात बदल होईल असं नाही. महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. देशपातळीवरही असेच चित्र आहे. भाजपकडून 400 पारचा नारा लावला जात आहे. शिवसेना फोडून 400 पार होत नाही हे भाजपला समजलं, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी फोडली. तरीदेखील 400 पेक्षा अधिक जागा जिंकता येणार नाहीत हे समजलं. त्यानंतर आता ते मनसेला सोबत घेत आहेत. तरीदेखील 400 चा आकडा पार करता येत नाही हे दिसत असल्यामुळे आता त्यांना रासपची गरज भासत आहे, असं कोल्हे म्हणाले.

कोणाचा प्रेवश होणार?

शरद पवार यांच्या पक्षाकडून वेगवेगळ्या जागांसाठी सक्षम उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी अनेक नेत्यांचा आगामी काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकतो. निलेश लंके यांच्या प्रवेशासाठी अमोल कोल्हे यांनी प्रयत्न केले. कोल्हेंची ही शिष्टाई सफल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर आणखी एक जबाबदारी सोपवल्याचं बोललं जातंय. ही जबाबदारी कोणती आहे, भविष्यात कोणते नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतही अमोल कोल्हे यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर बोलताना कोल्हे म्हणाले की, इन्कमिंग तर जोरदार आहे. ते येणाऱ्या काळात नक्की बघायला मिळेल. मी आता फक्त एवढंच सांगेन की वेट अँड वाच करावं. लवकरच सगळं स्पष्ट होईल. त्यांच्या या सूचक विधानानंतर आता शरद पवार यांच्या गटात आणखी कोण-कोण येणार, असा प्रश्न विचारला जातोय. याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.

हेही वाचा

Back to top button