माझ्याबाबत घाणेरडे बोलले, नियती पाहून घेईल; शिवतारेंचे अजित पवारांवर टीकास्त्र | पुढारी

माझ्याबाबत घाणेरडे बोलले, नियती पाहून घेईल; शिवतारेंचे अजित पवारांवर टीकास्त्र

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघात पवारऐवजी दुसरे आडनाव नाही का? माझी लढाई ही घराणेशाहीविरुद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयापेक्षा जनतेचा निर्णय महत्त्वाचा आहे. यासाठी मी बारामती मतदारसंघात लोकांची मते जाणून घेत असल्याचे सांगत 2019 च्या सांगता सभेत अजित पवार यांनी माझ्याबाबत घाणेरडे बोलले होते. मी त्यांच्यावर नाराज नाही. मी त्यांना माफ केले. मात्र, मतदारसंघातील जनता त्यांच्यावर नाराज आहे. अजित पवार यांना नियती पाहून घेईल, अशी टीका माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे.

भोर आणि राजगड तालुक्याच्या दौर्‍यावर जात असताना पुणे-सातारा महामार्ग कापूरहोळ (ता. भोर) येथे बुधवारी (दि. 20) दुपारी शिवसेना (शिंदे गटाचे) कार्यकर्त्याची विजय शिवतारे यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी पवार घराण्यावर प्रचंड टीका केली. या वेळी जिल्हाप्रमुख दिलीप यादव, युवासेना जिल्हाप्रमुख तुषार हंबीर, सागर मोकाशी, भोर विधानसभाप्रमुख गणेश मसुरकर, स्वप्निल गाडे, दशरथ यादव, संकेत खाडे,प्रवीण मसुरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

विजय शिवतारे पुढे म्हणाले की, भोरमधील लोकांना भेटत आहे, त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांना कळवणार आहे. बारामती मतदारसंघात पवार समर्थक 6 लाख 86 हजार मतदार आहेत. मात्र पवार विरोधी 5 लाख 50 हजार मतदार आहे. त्यांनी कोणाला मतदान करायचे ? वास्तविक मतदारांना दोन्ही पवार नकोय यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी त्यांना सांगितले की, बारामती मतदारसंघात लोकांना तिसरा पर्याय दिला पाहिजे. सगळे प्रकल्प बारामतीला असून, पवार प्रवृत्तीने सर्व संस्थांवर दहशत घराणेशाही ठेवली आहे. ती संपवायची आहे. 40 – 40 वर्षे पवारांनाच का लोकांनी मते द्यायची.

पवारांनी थोपटेंचे नुकसान केले

सन 1999 मध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भोर येथे झालेल्या जाहीर सभेत अनंतराव थोपटे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले होते, तर महाविकास आघाडी सत्तेत काँग्रेस पक्षाने आमदार संग्राम थोपटे यांना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचे ठरवले असताना पुण्यामध्ये आपल्यापेक्षा कोण मोठा व्हायला नको, या दृष्टिकोनातून पवार घराण्याने हस्तक्षेप करून त्यांना या पदापासून रोखण्याचे काम चुलता-पुतण्याने केले, असा आरोप करत थोपटे घराण्याच्या दोन पिढ्यांचे नुकसान केले असल्याचे शिवसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. िविजय शिवतारे यांनी पवार घराण्याच्या विरोधात दंड थोपटले आहे.

साथ देण्याचे अनंतराव थोपटे यांना शिवतारे यांचे आवाहन

शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी (दि. 20) माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत शरद पवारांचे नाव न घेता जुन्या गोष्टी विसरू नका, बदला घ्यायची हीच वेळ आहे. आता आम्हाला साथ द्या, अशी साद घातली आहे. या वेळी शिवसेना भोर शहराध्यक्ष नितीन सोनावले, दशरथ जाधव, दिलीप यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी 40 वर्षांचे राजकीय वैर बाजूला ठेवून अनंतराव थोपटे यांची संगमनेर-माळवाडी (ता. भोर) येथे भेट घेतली होती. त्यानंतर कापूरव्होळ (ता. भोर) येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात आमदार संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना साथ देऊ, असे सांगितले होते. आमदार संग्राम थोपटे यांना मंत्री होऊ दिले नाही, विधानसभा अध्यक्ष होऊ दिले नाही.

हेही वाचा

Back to top button