नीलेश लंकेंनी घेतली शरद पवारांची भेट; घड्याळ सोडून ‘तुतारी’ फुंकणार असल्याची चर्चा | पुढारी

नीलेश लंकेंनी घेतली शरद पवारांची भेट; घड्याळ सोडून 'तुतारी' फुंकणार असल्याची चर्चा

नगर; पुढारी वृत्तसेवा : आमदार नीलेश लंके यांनी अजित पवारांचे घड्याळ सोडून शरद पवारांची ‘तुतारी’ वाजविण्याचा निर्णय घेतला आहे. आज (दि. 14) पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कार्यालयाला भेट देऊन शरद पवार यांची भेट घेतली. दुसरीकडे, भाजपकडून खा. डॉ. सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून, नगरमध्ये आता विखेविरुद्ध लंके असा हायव्होल्टेज सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर आ. लंके यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंद केले. लंके अजित पवारांसोबत गेले असले, तरी त्यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम होता. गत पंधरवड्यात ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यावेळी शरद पवार गटाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती. त्यानंतर ते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. मात्र, त्यावेळी त्यांनी प्रवेश करण्याचे वृत्त फेटाळले होते.

भाजपकडून खा. विखे यांची उमेदवारी जाहीर होताच आ. लंके यांच्या राजकीय हालचाली वेगवान होत त्यांचा शरद पवार गटात पक्ष प्रवेश पक्का झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नगर लोकसभेसाठी भाजपचे खा. विखेविरुद्ध आ. लंके असा अटीतटीचा सामना रंगतदार होणार असल्याची चिन्हे आहेत.

अजित पवारांची मुंबईत भेट

आ. लंके यांनी बुधवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ‘देवगिरी’ निवासस्थानी झालेल्या भेटीत आ. लंके यांनी नगरच्या राजकीय परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री पवारांना अवगत केले. कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढविणार असल्याचे सांगत आ. लंके यांनी अजित पवारांचे आशीर्वाद घेतले. शरद पवार गटात प्रवेश करून महाविकास आघाडीकडून उमेदवारी करण्याचा निर्णय आ. लंके यांनी अजित पवार यांना स्पष्ट शब्दांत कळविला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

शरद पवारांची आज पुण्यात बैठक

शरद पवार यांनी पक्षाच्या आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकार्‍यांची बैठक पुण्यात बोलावली आहे. नगर दक्षिणेतील प्रमुख नेत्यांना बैठकीचे निरोप जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिले आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नसतानाही शरद पवारांनी नगरची बैठक बोलावली आहे. त्यात महाविकास आघाडीकडून आ. लंके यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

Back to top button