बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात विमानतळाच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या नव्या बसस्थानकातून गुरुवार (दि. 7)पासून बससेवेला प्रारंभ झाला. या स्थानकावर एकाच वेळी 22 फलाटांवर बसगाड्या उभ्या राहू शकतात, अशी प्रशस्त व्यवस्था आहे. आगार व्यवस्थापक वृषाली तांबे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी प्रवाशांना गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत करण्यात आले.
बारामती शहरातील जुने बसस्थानक पाडून त्या जागी नवीन स्थानक उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. तीन वर्षात हे काम पूर्ण करण्यात आले. गेली तीन वर्षे तात्पुरत्या स्वरुपात कसबा भागात बसस्थानक हलविण्यात आले होते.
तेथे प्रवाशांना दोन वर्षे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले, परंतु अखेर प्रवाशांचा हा त्रास आता संपला असून नवीन बसस्थानकातून बससेवेला प्रारंभ झाला. नवीन बसस्थानकात प्रशस्त स्वच्छतागृहे आहेत. महिलांसाठी हिरकणी कक्ष असून दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा आहे. बसस्थानकाच्या वरच्या मजल्यावर एसटी बँकेला जागा देण्यात आली आहे. 200 आसन क्षमतेचा एक मोठा व 50 आसन क्षमतेचा एक छोटा असे दोन बैठक हॉल आहेत. वरिष्ठ अधिकार्यांच्या वास्तव्यासाठी सुसज्ज सूट असून चालक-वाहकांसाठी विश्रांती कक्ष उपलब्ध आहे. आता यापुढील काळात नवीन स्थानकावरूनच सर्व बसगाड्या सुटणार असून बाहेरून येणार्या बस याच स्थानकावर येतील. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन तांबे यांनी केले.
हेही वाचा