PMC budget 2024 : अंदाजपत्रकातून पुणेकरांचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न | पुढारी

PMC budget 2024 : अंदाजपत्रकातून पुणेकरांचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणेकरांना चांगल्या योजनांबरोबरच, उद्याने, रस्ते, स्वच्छ पाणी, चांगले आरोग्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पुणेकरांचे राहणीमान उंचवण्याचा प्रयत्न अंदाजपत्रकाच्या माध्यमातून केला आहे, असे मत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केले. महापालिकेचे 2024 – 25 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी सादर केले. त्यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळातील हे चौथे अंदाजपत्रक होते. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, प्रशासक म्हणून दुसरे अंदाजपत्रक सादर करण्याची संधी प्राप्त झाल्याने आनंद होत आहे.

पुणे शहर जागतिक व देशातील इतर अग्रगण्य शहरांपैकी एक असून सर्वांना आकर्षित करणारे आहे. चांगले जीवनमान व राहण्यास सुयोग्य शहर असल्याने तसेच रोजगाराच्या संधी, दर्जेदार शिक्षण, जगातील नावीन्यपूर्ण गोष्टी तत्परतेने आत्मसात करणारे वातावरण यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. त्यासोबतच महापालिका हद्दीत नव्याने गावे समाविष्ट झाल्याने पायाभूत सोयी-सुविधांवर दिवसेंदिवस ताण वाढत आहे. या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून सर्वसमावेशक विकास करण्याची अंतिमतः जबाबदारी प्रशासनावर असते. अंदाजपत्रक तयार करताना वाढीव सेवा मागणी व उपलब्ध निधी यांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

विकासात पारदर्शकपणा व गतिमानता याचा विचार करून व शहराच्या विकासाची दिशा निश्चित करून अंदाजपत्रक सादर केले आहे. एकंदरीतच पुणेकरांचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले. महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, समाविष्ट गावे, रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, घनकचरा विभागाच्या कामांना भरीव तरतूद यात केली आहे. ग्रीन हायड्रोजन एनर्जी प्रकल्प, सहाशे हेक्टरवरील टीपी स्कीम, रेंटल हौसिंग सोसायटी, पाच नवीन अग्निशमन केंद्र उभारणी आदी या अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये आहेत. गतवर्षीप्रमाणे मिळकत करात कोणतीही वाढ यात सुचविण्यात आली नाही.

हेही वाचा

Back to top button