उत्पन्नात बांधकाम विभाग जोमात; पाणीपुरवठा विभाग कोमात | पुढारी

उत्पन्नात बांधकाम विभाग जोमात; पाणीपुरवठा विभाग कोमात

हिरा सरवदे

पुणे : महापालिकेच्या उत्त्पन्नातील महत्त्वाचा घटक असलेल्या बांधकाम विभागाचे उत्पन्न जोमात असून, पाणीपुरवठ्याचे उत्पन्न मात्र फारच कमी जमा झाले आहे. मिळकतकर विभागाचे उत्पन्न मंगळवारपर्यंत 82 टक्के जमा झाले आहे. महापालिकेच्या माध्यमातून अनेक प्रकारची विकासकामे केली जातात. या कामांसाठी शासनाकडून काही प्रमाणात निधी मिळतो. मात्र, 90 ते 95 टक्के निधी हा महापालिका विविध कर व शुल्कामधून खर्च करते. महापालिकेच्या अंदाजपत्रातील उत्पन्न व खर्चाचा आलेख दरवर्षी चढत्या क्रमाने वाढत आहे. स्थायी समितीच्या माध्यमातून दरवर्षी अंदाजपत्रकात हजार कोटींची भर घातली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उत्पन्नात मात्र, फारसी वाढ होत नव्हती, त्यामुळे जमा आणि खर्च यांमधील तफावत वाढत होती.

महापालिकेत प्रशासकराज आल्यानंतर प्रशासक या नात्याने महापालिका आयुक्त फुगवटा असलेले अंदाजपत्रक सादर न करता वास्तववादी अंदाजपत्रक सादर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दरवर्षीचा पायंडा कायम ठेवला. त्यांनी सन 2022-23 च्या अंदाजपत्रकापेक्षा 2023-24 चे अंदाजपत्रक हजार कोटींपेक्षा अधिक वाढवून 9 हजार 515 कोटींचे सादर केले. या अंदाजपत्रकात त्यांनी एलबीटी अनुदान 455.31 कोटी, जीएसटी अनुदान 2316.31 कोटी, मिळकतकर 2318.15 कोटी, विकास (बांधकाम शुल्क) 1804.83 कोटी, पाणीपट्टी 509.73 कोटी, शासकीय अनुदान 541.82 कोटी, इतर जमा 957.28 कोटी, कर्जरोखे 400 कोटी आणि प्रधानमंत्री आवास योजना 201.54 कोटी गृहीत धरले आहे. मात्र, महापालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत जमा झालेल्या उत्पन्नानुसार बांधकाम विभागाचे उत्पन्न जोरात असून, मिळकतकर विभागाचे उत्पन्न उद्दिष्टाच्या 82 टक्क्यांपर्यंत जमा झाले आहे.

तर पाणीपुरवठा विभागाचे उत्पन्न उद्दिष्टांपेक्षा फारच कमी जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यास तीन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असल्याने पाणीपट्टी विभागाला थकबाकी वसुलीसाठी कडक मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. दरम्यान, मोठ्या संस्थांची पाणीपट्टी अद्याप जमा झालेली नाही. या पाणीपट्टीच्या थकबाकीचे धनादेश मार्चअखेर जमा होतील, असे पाणीपुरवठा अधिकार्‍यांनी सांगितले.

आजवर मिळालेले उत्पन्न (कोटीमध्ये) :

विभाग – मंगळवापपर्यंत मिळालेले उत्पन्न – (उद्दिष्ट)

  •  बांधकाम विभाग – 1748.30 – (1804.83)
  •  मिळकतकर – 20021 – (2318.15)
  • पाणीपट्टी – 112 – (509.73)

हेही वाचा

Back to top button