पीएसआयच्या कारमधून आणखी दोन कोटींचे मेफेड्रोन जप्त | पुढारी

पीएसआयच्या कारमधून आणखी दोन कोटींचे मेफेड्रोन जप्त

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मेफेड्रोन विक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या उपनिरीक्षकाच्या कारमधून आणखी दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे ‘एमडी’ जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे जप्त मेफेड्रोनचा आकडा ४७ किलो २०० ग्राम इतका झाला आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे किंमत ४७ कोटींच्या पुढे असल्याचे सांगितले जात आहे. एका पोलिस अधिकाऱ्यांच्या गाडीतून मेफेड्रोन जप्त केल्याने पिंपरी-चिंचवड पोलिस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. विकास शेळके (नेमणूक – निगडी पोलिस ठाणे), असे निलंबित केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आरोपी नमामी शंकर झा याला सांगवी परिसरात ‘एमडी ड्रग्स’ बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता पोलिस उपनिरीक्षक विकास शेळके याचे नाव समोर आले. दरम्यान, पोलिसांनी शेळके यालाही बेड्या ठोकल्या. या प्रकरणात पोलिसांनी ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपये किमतीचे ४४ किलो ७९० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले. त्यानंतर उपनिरीक्षक शेळके याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने कारमध्ये आणखी एमडी ड्रग्स ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाने शेळके याच्या कारमधून आणखी दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे दोन कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त केले.

आतापर्यंत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात ४७ किलो १९० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्स जप्त केले आहे. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक विकास शेळके याचा गुन्ह्यात थेट सहभाग आढळल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

मेफेड्रोन विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या उपनिरीक्षक शेळके याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, त्याच्या कारमध्ये आणखी मेफेड्रोन ड्रग्स असल्याचे समोर आले. त्यानुसार, आणखी दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे ड्रग्स जप्त केले आहे.
– वैभव शिंगारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी-चिंचवड

Back to top button