आत्तापर्यंत दीड कोटी प्रवाशांचा मेट्रोप्रवास ; 21 कोटी 47 लाख रुपयांचे उत्पन्न | पुढारी

आत्तापर्यंत दीड कोटी प्रवाशांचा मेट्रोप्रवास ; 21 कोटी 47 लाख रुपयांचे उत्पन्न

प्रसाद जगताप

पुणे : मेट्रोच्या दोन टप्प्यांमधील सेवा आता सुरू झाल्यामुळे प्रवासीसंख्येत चांगलीच वाढ होत असून, मेट्रोसेवा सुरू झाली तेव्हापासून आत्तापर्यंत 1 कोटी 44 लाख 799 म्हणजेच जवळपास दीड कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. याद्वारे मेट्रोला 21 कोटी 46 लाख 29 हजार 324 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मार्च 2022 पासून मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात सुरू होणार्‍या या सेवेला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर खर्‍या अर्थाने मेट्रो पुण्यात धावायला लागली. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजेच फेब्रुवारी 2024 पर्यंत दीड कोटींच्या घरात मेट्रो प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद महामेट्रो प्रशासनाने केली.

पुण्यात प्रवाशांची ये-जा सर्वाधिक

वनाज ते रुबी हॉल मेट्रो स्थानक हा टप्पा पूर्ण झाला असून, त्यावर मेट्रोची सेवा सुरू झाली आहे. मेट्रोच्या पुणे, पिंपरी-चिंचवड येथे सुरू झालेल्या मार्गांपैकी पुण्यातील याच मार्गांवर सर्वाधिक प्रवासीसंख्या आहे. मार्च 2022 पासून आत्तापर्यंत (फेब—ुवारी 2024) या मार्गावर म्हणजेच या मार्गावर 86 लाख 86 हजार 845 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून मेट्रोला 12 कोटी 50 लाख 17 हजार 733 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवड मेट्रोमार्ग दुसर्‍या क्रमांकावर

पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या मार्गावरसुध्दा मेट्रो धावायला सुरुवात झाली आहे. मार्च 2022 ते फेब—ुवारी 2024 पर्यंत या मार्गावरून 57 लाख 21 हजार 154 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्याद्वारे मेट्रोला 8 कोटी 96 लाख 11 हजार 790 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

मेट्रोची प्रवासीसंख्या वाढत आहे. जानेवारीमध्ये 56 हजार होती. फेब—ुवारीत ती 61 हजारांच्या घरात गेली. आता लवकरच रुबी हॉल ते रामवाडी तिसरा टप्पा सुरू होणार आहे. त्यामुळे आता प्रवासीसंख्या आणखीनच वाढेल, अशी अपेक्षा आहे.

– हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

हेही वाचा

Back to top button