राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रवेश करू : आढळराव पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रवेश करू : आढळराव पाटील

मंचर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ग्रीन सिग्नल' दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला माझी उमेदवारी मान्य असेल तर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जाऊ शकतो, असे शिवसेनेचे नेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये होत होती. याबाबत शिवसैनिक व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आढळराव पाटील यांनी लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. 29) शिवसैनिकांची तातडीची बैठक बोलावून त्यांची मते आजमावून घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

येणार्‍या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून वेळप्रसंगी परिस्थितीनुसार निर्णय घ्या, पण निवडणूक लढवा अशी शिवसैनिक व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचेही आढळराव-पाटील यांनी सांगितले. या वेळी माजी आमदार शरद सोनवणे, इरफान सय्यद, अरुण गिरे, सुनील बाणखेले, सागर काजळे, संतोष डोके, रवींद्र करंजखेले, सचिन बांगर, प्रवीण थोरात पाटील, योगेश बाणखेले, रवींद्र वळसे पाटील, स्वप्निल बेंडे पाटील, शैलेश आढळराव पाटील उपस्थित होते. अनेक वेळा राज्यात सामंजस्याने उमेदवार आणि पक्ष अदलाबदली झालेले आहेत, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगून आढळराव म्हणाले, शिरूर लोकसभेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांची बैठक झाली आहे.

मात्र, या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप माहीत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कार्यकर्त्यांशी बोलून मी निर्णय घेईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झालेली नाही, मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झाली असून, येत्या चार-पाच दिवसांत उमेदवारीचा तिढा सुटेल असे मला वाटते, असे आढळराव या वेळी म्हणाले. आढळराव पाटील यांच्याबाबत आमदार दिलीप मोहिते यांनी म्हटले होते की, त्यांनी माझ्याबाबत खालच्या पातळीवर टीका केलेली आहे. तसेच मला तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केले होते, याबाबत विचारले असता आढळराव पाटील म्हणाले की, मोहिते पाटील व माझे वैयक्तिक हेवेदावे असतील; मात्र त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा खासदार निवडून आणणे महत्त्वाचे आहे. मी त्यांच्या नेहमी संपर्कात असतो, मी त्यांना कधी हानी पोहोचवली नाही. त्यांचे गैरसमज असतील तर ते बसून दूर करू, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news