आमच्या सहनशक्तीशी खेळू नका : पोलिस आयुक्तांनी तिखट शब्दांत सुनावले

आमच्या सहनशक्तीशी खेळू नका : पोलिस आयुक्तांनी तिखट शब्दांत सुनावले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी तुमची नाही का? रस्ते सुस्थितीत ठेवायला अडचण काय आहे? तुम्हाला कितीदा सांगून झाले, शुक्रवारचा सूर्योदय होण्यापूर्वी रस्त्याची डागडुजी झाली पाहिजे. काम झाल्याशिवाय तुम्ही घरी जाऊ नये, आमच्या सहनशक्तीशी खेळू नका, अशा तिखट शब्दांत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकार्‍यांना फौलावर घेत सुनावले.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील आचार्य आनंदऋषीजी चौकाची गुरुवारी (दि. 29) दुपारी एक वाजता पाहणी केल्यानंतर पोलिस आयुक्तांनी मेट्रो आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांची शाळाच घेतली.

अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी, शफील पठाण, महापालिकेच्या पथविभागाच्या प्रमुख अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अमर शिंदे, 'पीएमआरडीए'च्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, पुणेरी मेट्रोचे अक्षय शर्मा आणि मारुती श्रीवास्तव, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, निरीक्षक राजकुमार शेरे उपस्थित होते. अमितेश कुमार यांनी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील, याबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली.

वाहतूक पोलिस टीकेचे धनी

मेट्रोवाल्यांकडून काम सुरू करताना अनेकदा वाहतुकीचा विचार केला जात नाही. एकाच वेळी त्यांच्याकडून पाच ते सहा ठिकाणांची कामे केली जातात, मात्र सांगताना टप्प्या टप्याने कामे करू, असे सांगितले जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाहतूक कोंडी होणार्‍या चौकातील कामे जलदगतीने करणे गरजेचे आहे, परंतु त्यांच्याकडून तसे होताना दिसून येत नाही. वेगाने काम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ त्यांच्याकडून लावले जात नाही. महापालिका, मेट्रो आणि पीएमआरडीए या तीन विभागांची येथे कामे सुरू आहेत. त्यांच्यातील समन्वयाचा अभावदेखील वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत असल्याचे बोलले जाते. परंतु, यामध्ये वाहतूक पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागत असल्याचे वास्तव आहे.

गणेशखिंड रस्ता, आचार्य आनंदऋषीजी चौक येथील वाहतुकीची परिस्थिती सुधारण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करण्यात येतील. दोन दिवसांतच त्यासंबंधी आदेश काढून अंमलबजावणी केली जाईल. तसेच, मेट्रो आणि महापालिका प्रशासनाकडून केली जाणारी कामे तातडीने करण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच सकारात्मक परिणाम दिसतील.
अमितेश कुमार (पोलिस आयुक्त, पुणे शहर)

आणखी किती वेळ लागेल?

असमतोल रस्ता, खडबडीत रस्ता, भरचौकातील असलेला खड्डा या गोष्टींमुळे वाहनांचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागण्यासाठी आणखी हातभार लागतो. या त्रुटी दूर केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळेल. ही कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल,' असा सवाल अमितेश कुमार यांनी पुणेरी मेट्रोच्या अधिकार्‍यांना केला. त्यावर किमान उद्या रात्रीपर्यंतची मुदत द्यावी, अशी विनंती अधिकार्‍यांनी केली.

जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध

गणेशखिंड रस्त्यावर जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला आहे. यात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी असेल, तर महापालिका, मेट्रो किंवा अन्य कामांसाठी लागणारी वाहने, उदाहरणार्थ- रोड रोलर, जेसीबी आदी प्रकारच्या वाहनांना रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेतच गणेशखिंड रस्त्यावरून ये-जा करण्यास परवानगी दिली जाईल, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news