दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी टॉवर उभे करण्याचे आव्हान | पुढारी

दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी टॉवर उभे करण्याचे आव्हान

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्याच्या दुर्गम भागात ‘बीएसएनएल’चे 93 मोबाईल टॉवर उभे करण्यात येणार आहेत. त्यापैकी केवळ 30 टॉवरच उभे राहिल्याचे चित्र पुढे आले आहे. यापैकी 13 टॉवर पानशेत खोर्‍यातील दुर्गम खेड्यात उभारण्यात येणार आहेत. यातील फक्त तीनच टॉवर उभे केले आहेत. त्यामुळे या दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी मोबाईल टॉवरचे काम पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. तसेच यातील एकही मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्यात आलेला नाही, तर टॉवरच्या कनेक्शनसाठी केबल टाकण्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे.

केबल टाकण्याचे काम सुरू

पानशेत धरण खोर्‍यातील वेल्हे तालुक्यातील शिरकोली, पोळे व वरघड येथे टॉवर उभे करून सौरऊर्जेचे पॅनेलही उभे केले आहेत. आंबेगाव खुर्द, घिवशी येथे अद्यापही काम सुरू झालेले नाही. पानशेत खोर्‍यात मोबाईल टॉवरसाठी इंटरनेट कनेक्शनच्या केबल टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी मुख्य रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू आहे. आंबेगाव खुर्द, घिवशीपर्यंत केबल टाकण्याचे काम केले जात आहे.

बीएसएनएलच्या वतीने मोबाईल टॉवर उभे केले जात आहेत. केबल कनेक्शनचे काम दुसरी संस्था करीत आहे. टॉवर उभारणीनंतर केबल कनेक्शन दिले जाते. 93 पैकी 30 टॉवरचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी उर्वरित सर्व टॉवर पूर्ण होऊन दुर्गम तसेच ग्रामीण भागात मोबाईल इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे.

– सतीश फिरके, उपमहाप्रबंधक, बीएसएनएल

हेही वाचा

Back to top button