निमगाव केतकीत बारदाना दुकानासह गोदाम जळून खाक; लाखोंचे नुकसान | पुढारी

निमगाव केतकीत बारदाना दुकानासह गोदाम जळून खाक; लाखोंचे नुकसान

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : बारदाना दुकानासह पाठीमागील गोदामाला आग लागून अंदाजे 20 लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाले. निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे सोमवारी (दि. 26) सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. गावातील पुणे जिल्हा बँकेच्या शेजारी नितीन बोरीकर यांच्या मालकीच्या जागेत देविदास प्रमोद झांजे यांनी बारदानाचे दुकान व गोदाम भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतले आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता या दुकानाला अचानक आग लागली. या वेळी स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानात असलेला बारदाना आणि विक्रीस आणलेली वाळलेली चिंच यामुळे आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती.

आगीचे लोट आकाशात दूरपर्यंत पसरले होते. तातडीने अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आले. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व इंदापूर नगरपरिषदेचे एकूण दोन अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेला बारदाना, चिंचेंची पोती, दोन दुचाकी, फ्रिज, टीव्ही, संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे आदी वस्तू पूर्णतः जळून खाक झाले. यामध्ये झांजे यांचे एकूण 20 लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तलाठी गोरक्षनाथ इंगळे, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत जगताप, पोलिस पाटील अतुल डोंगरे, संतोष जाधव यांनी पंचनामा केला. तसेच संबंधित विभागाकडे जळीताचा तातडीने पंचनामा पाठविला आहे. आगीचे कारण अद्याप समजले नसले तरी झालेल्या नुकसानीचे शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करू, असे तलाठी इंगळे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button