

कोथरूड : पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौक येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यासाठी बहुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला. त्याचे नुकतेच उद्घाटन झाले असून, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे. परंतु सर्व्हिस रोडवर दिशा चुकली की अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रचंड सावधानता बाळगत प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहराचा पश्चिम दरवाजा म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे. येथून भूगाव, पौड, मुंबई, सातारा, पाषाणकडे जाणे सोईस्कर ठरते. येथे वाहनांची कायम रहदारी असते. चौकात उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण केल्याने वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली आहे.
उजवी भुसारी कॉलनीकडून डुक्कर खिंडीकडे जाणार्या सर्व्हिस रोडवर दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूने दुहेरी वाहतूक होत असून, वाहने बिनधास्तपणे ये-जा करतात. दुभाजक मध्येच सोडलेले असल्याने वाहने वळताना धोका होण्याची शक्यता असते. तसेच वळणावर रस्ता असल्याने समोरून कोणते वाहन येत आहे, याचा नेमका अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडत असल्याची माहिती स्थानिक नागरिक वैभव मुरकुटे यांनी दिली. महामार्ग विभागाचे अधिकारी अंकित यादव म्हणाले, काही दिवसांपूर्वी येथे अपघात घडला होता. याबाबत पालिका, पोलिस व आमच्या खात्याकडून एकत्रित पाहणी करण्यात आली. अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात येईल. सूचना फलक लावण्यात आले आहेत. वाहनचालकांनी याचे पालन केल्यास अपघात निश्चित कमी होऊ शकतात.
हेही वाचा