कचरा दुर्गंधी पुन्हा डोके वर काढणार?; रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील समस्या | पुढारी

कचरा दुर्गंधी पुन्हा डोके वर काढणार?; रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील समस्या

नितीन वाबळे

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : रामटेकडी औद्योगिक वसाहत येथील ’रोकेम’ व ’दिशा’ हे दोन कचरा प्रकल्प बंद आहेत. त्यामुळे कचर्‍याच्या दुर्गंधीतून परिसरातील नागरिकांची सुटका झाली होती. परंतु, आता या ठिकाणी ’व्हेरिएट वेस्ट एनर्जी’ हा 300 मेट्रिक टन प्रक्रियेचा कचरा प्रकल्प सुरू करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू आहे. त्यामुळे येथील कचरा दुर्गंधी समस्या पुन्हा डोके वर काढणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

रोकेम कचरा प्रकल्पासाठी संबंधित कंपनीने 125 कोटी रुपये खर्च करून येथे हा प्रकल्प उभा केला होता. या ठिकाणी दररोज 700 टन कचर्‍यावर प्रक्रिया करणे अपेक्षित होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे दररोज 200 ते 300 टन कचर्‍यावर प्रक्रिया होत होती. त्यामुळे अखेर हा प्रकल्प बंद झाला. मात्र, या प्रकल्पाशेजारी असलेल्या दिशा (दिशा कचरा प्रकल्प मागील आठ वर्षांपासून बंद आहे) प्रकल्पाच्या ठिकाणी ‘व्हेरिएट वेस्ट एनर्जी’ हा प्रकल्प महापालिका लवकरच सुरू करणार आहे. या प्रकल्पाच्या पाठीमागील मोकळ्या जागेवर कोरोना काळात महापालिकेने साठविलेल्या कचर्‍याचा ढीग आहे. हा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाने टेंडर काढले होते. मात्र, त्यामधील सुमारे दहा हजार टन कचरा अद्याप येथे शिल्लक आहे. तो कधी उचलला जाणार? असा सवाल नागरिक करीत आहेत.

रामटेकडी औद्योगिक वसाहत येथे नागरिक राहावयास आहेत. येथील कचरा प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू झाल्यावर त्याची दुर्गंधी वाढू लागल्यास आम्ही याविषयी न्यायालयात जाऊन हे प्रकल्प बंद करण्याची मागणी करणार आहोत.
– आनंद उत्तरकर, हिल साईड सोसायटी,  रामटेकडी औद्योगिक वसाहत
रामटेकडी येथे होत असलेल्या ‘व्हेरिएट वेस्ट एनर्जी’ कचरा प्रकल्पामुळे दुर्गंधी निर्माण होणार नाही, यासाठी उपाययोजना करणार असून, या ठिकाणी येणार्‍या सर्व कचर्‍यावर दररोज प्रक्रिया करण्यात येणार आहे.
– कमलेश शेवते,  उपअभियंता, घनकचरा विभाग, महापालिका.

दुर्गंधीबाबत खबरदारी घ्यावी

रामटेकडी येथे दिशा व रोकेम या कचरा प्रकल्पांमुळे दुर्गंधी निर्माण झाली होती. कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार व रामटेकडी परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. हे दोन्ही प्रकल्प बंद करावेत, अशी नागरिकांची मागणी होती. पण,
हे दोन प्रकल्प बंद झाल्यानंतर आता येथे नव्याने होणार्‍या कचरा प्रकल्पांतून दुर्गंधी येऊ नये, याची महापालिकेने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Back to top button