आज लढलो नाही, तर भाजप काही ठेवणार नाही : आ. रोहित पवार | पुढारी

आज लढलो नाही, तर भाजप काही ठेवणार नाही : आ. रोहित पवार

मंचर : पुढारी वृत्तसेवा : देशामध्ये भाजपकडून गुंतागुंतीचे राजकारण केले जात असून, दोन समाजांत, दोन धर्मांत वाद लावण्याचे काम सुरू आहे. संतांचे, वारकरी समाजाचे विचार त्यांना नको आहेत. त्यामुळे आपण आज त्यांच्याविरोधात लढलो नाही, तर भाजप काही ठेवणार नाही. येत्या 21 तारखेला मंचर येथे शरद पवार यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले. मंचर (ता. आंबेगाव) येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरूर व आंबेगाव विधानसभा कार्यकारिणी पदाधिकारी आढावा बैठक कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, रविकांत वरपे, डॉ. हरिश खामकर, तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, युवक अध्यक्ष गणेश यादव, संजय बढेकर, गोपाळराव गवारी, दादाभाऊ थोरात, विशाल वाबळे, संदीप निकम आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार रोहित पवार म्हणाले की, भाजपला आता दोन गट जाऊन मिळाले असून, गेलेल्या नेत्यांचा फक्त लोकसभेसाठी फायदा करून घ्यायचा आहे. नंतर विधानसभेला त्यांचा विचार केला जाणार नाही. उलट गेलेल्या आमदारांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल, असे चित्र तयार होईल, असे रोहित पवार म्हणाले. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव न घेता टीका केली.या वेळी देवदत्त निकम यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन गणेश यादव यांनी केले.

आंबेगावचा लोकप्रतिनिधी सोडून गेल्याचे पवार यांना दुःख

या वेळी रोहित पवार यांनी वळसे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांना पवार यांच्यामुळे खूप काही मिळाले. शरद पवार यांचे पुत्र म्हणून त्यांची ओळख होती. ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, पवार यांना अनेक जण सोडून गेले. मात्र, आंबेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी त्यांना सोडून गेल्याचे त्यांना सर्वाधिक दुःख झाले.

हेही वाचा

Back to top button