Maratha Reservation : सकल मराठा समाजाचा वाघोलीत रास्ता रोको | पुढारी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाचा वाघोलीत रास्ता रोको

वाघोली : पुढारी वृत्तसेवा : सगेसोयरे अधिसूचनेचा कायदा करण्यासाठी आणि मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वाघोली येथील पुणे-नगर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ’रास्ता रोको’ करण्यात आला. एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, जय शंभूराजे, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे ,अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. लोणीकंद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मराठा समाजबांधवांनी सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त करीत ’रास्ता रोको’ केला. शासनाने तत्काळ सगेसोयरे अधिसूचनेच्या कायद्यासह अन्य मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी या वेळी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर पोलिसांना निवेदन देण्यात आले. ’रास्ता रोको’मुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होती. आंदोलनामध्ये मराठा बांधवांसह मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या.

…अखेर ‘रास्ता रोको’ला परवानगी

सकल मराठा समाजाच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलनासाठी रीतसर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केसनंद फाट्यावरील चौकीमध्ये करण्यात आली होती. परंतु, पोलिसांनी परवानगी देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मराठा समाज अजूनच आक्रमक झाला. परवानगी मिळत नाही तोपर्यंत पोलिस चौकीसमोरच उपोषण करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी मराठा बांधवांशी चर्चा करून परवानगी दिली तसेच निवेदन स्वीकारले.

हेही वाचा

Back to top button