आज होणार गणेश जयंती साजरी; जाणून घ्या शुभ मुहूर्त | पुढारी

आज होणार गणेश जयंती साजरी; जाणून घ्या शुभ मुहूर्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्युत रोषणाईने झगमगलेली मंदिर… उत्सवमंडपात केलेली खास सजावट…. गणेश मंडळांच्या ठिकाणीही सुरू असलेले सजावटीचे काम अन् धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनात व्यग्र असलेले गणेश मंडळांचे कार्यकर्ते… असे वातावरण सध्या श्री गणेश जयंतीनिमित्त शहरभर आहे. मंगळवार (दि. 13) श्री गणेश जयंती असल्याने मंदिरांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विद्युतरोषणाई, उत्सवमंडपाची उभारणी, फुलांच्या सजावटीचे कामही पूर्णत्वास आले आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या वेळापत्रकाचे फलक मंदिरांच्या ठिकाणी पाहायला मिळत असून, ग्रामदैवत श्री कसबा गणपती देवस्थान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, सारसबागेतील गणपती मंदिर आदी मंदिरे विदयुतरोषणाईने झगमगली आहेत.
श्री गणेश जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये खास नियोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, त्याची तयारीही पूर्ण झाली आहे. शहरातील मंदिरांत उत्सवाचा रंग पाहायला मिळत असून, उत्सवमंडपासह सजावटीचे कामही पूर्णत्वास आले आहे. काही मंदिरांमध्ये गणेश जयंती उत्सवाला सुरुवातही झाली असून, भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. सनई-चौघडा वादनासह भजन-कीर्तन, अथर्वशीर्षपठण, भक्तिसंगीत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होत आहेत.
मंडळांनीही श्री गणेश जयंतीसाठी खास तयारी केली असून सामाजिक उपक्रमांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री गणेश जयंतीनिमित्त खरेदीसाठीही बाजारपेठेत लगबग पाहायला मिळत असून, पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी लोकांनी मंडई, रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग आदी ठिकाणी गर्दी केली. खरेदीसाठी आलेल्या लोकांनी मंदिरांत जाऊन गणरायाचे दर्शनही घेतले.

माघ महिन्यात गणेश जयंती शुभ मुहूर्त

गणेश जयंती – मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024
माघ महिन्याची शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी प्रारंभ – 12 फेब्रुवारी 2024, सोमवार, संध्याकाळी 5.44 पासून.
माघ महिन्याची शुक्ल पक्ष चतुर्थी समाप्ती तारीख – 13 फेब्रुवारी 2024, मंगळवार, दुपारी 2:41 वाजता समाप्त होईल.
मध्यान्ह पूजेची वेळ – मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024, दुपारपूर्वी, सकाळी 11:29 ते दुपारी 1:42 पर्यंत.

Back to top button