आधार क्रमांक, ठशांशिवाय मिळणार दस्ताची प्रत; नोंदणी व मुद्रांक विभागाचा निर्णय | पुढारी

आधार क्रमांक, ठशांशिवाय मिळणार दस्ताची प्रत; नोंदणी व मुद्रांक विभागाचा निर्णय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भाडेकरार किंवा खरेदी-विक्री दस्तऐवजांवर पक्षकारांचे छायाचित तसेच अंगठ्याचे ठसे असणे बंधनकारक आहे. याबरोबरच ओळखीसाठी पक्षकार व ओळख देणार यांचे आधारकार्ड जोडण्यात येते. हे नोंदणीकृत दस्त संकेतस्थळावरून डाऊनलोड केल्यानंतर त्यातील आधार क्रमांक, आणि ठसे याचा गैरवापर होऊ नये, यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने आधार क्रमांक आणि अंगठ्याचे ठसे सुरक्षित केले आहेत. त्यामुळे आता दस्ताची प्रत डाऊनलोड केल्यानंतर त्यावर आधार क्रमांक आणि ठसे दिसणार नाही.

राज्याचा नोंदणी व मुद्रांक विभाग हा अधिकाधिक ऑनलाईन सुविधा देण्यात अग्रेसर आहे. तसेच आता नागरिकांची माहिती गोपनीय ठेवण्यास नोंदणी विभागाने प्राधान्य दिले आहे. नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावरून भाडेकरार अथवा सदनिका, दुकाने, जमिन आदी खरेदी-विक्री व्यवहारांचे दस्त डाऊनलोड करता येतात. दस्तांच्या प्रती डाऊनलोड करण्यासाठी नोंदणी विभाग शुल्क आकारते. ई- सर्चमधून हे दस्त उपलब्ध होतात.

देशातील पहिला उपक्रम

आता दस्तांवर गोषवारा भाग-2 वर, पक्षकारांचे फोटो आणि स्वाक्षरी एवढीच दिसेल. त्याचे ठसे या ठिकाणी केवळ ’बरोबर’ असे चिन्ह दिसेल. तसेच अंगठ्याचे ठसे विभागाचे सर्व्हरवर जतन केले जाणार आहेत. ते ठसे सामान्य व्यक्तींना दिसणार नाहीत. हा उपक्रम महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने देशात प्रथम राबविलेला आहे.

हेही वाचा

Back to top button