जे महायुतीत येतील त्यांचे स्वागत : हर्षवर्धन पाटील | पुढारी

जे महायुतीत येतील त्यांचे स्वागत : हर्षवर्धन पाटील

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आम्हाला मान्य झाले तेव्हा 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. अजित पवारांना थोडे उशिरा कळाले तेव्हा ते आले. अजूनही काही जण पुढील काळात येतील. जे जे महायुतीमध्ये येतील त्यांचे स्वागतच आहे, असे मत पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. साते, वडगाव मावळमध्ये नव्याने सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठाला माध्यम प्रतिनिधींनी भेट दिल्यानंतर प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह मिळाले आहे.

या निर्णयावर ते म्हणाले, देशपातळीवर निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. आयोगाकडे ज्या दहा सुनावण्या झाल्या त्यामध्ये दोन्ही बाजूने जे पुरावे सादर करण्यात आले, त्या पुराव्यांचा अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह दिले. युतीतील एक घटक म्हणून मी या निर्णयाचे स्वागत करतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती अधिक मजबूत होईल. येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेजण एकत्रितरित्या चांगले काम करू आणि पुन्हा पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी यांची निवड होईल, असा प्रयत्न राहील.

बारामतीच्या जागेबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाला पाहता यावर ते म्हणाले, लोकसभेचे निर्णय सर्व राष्ट्रीय स्तरावर होतात. महायुती असल्याने महाराष्ट्रातील 48 जागा आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या जागा द्यायच्या, अजित पवार यांना कोणत्या जागा द्यायच्या, भाजपला कोणत्या जागा द्यायच्या या संदर्भातील निर्णय राज्यातील तीन नेते मंडळी, राष्ट्रीय स्तरावरची नेते मंडळी एकत्र येऊन बसून ठरवतील. पहिल्यांदा जागा वाटपाचा निर्णय होईल. त्यानंतर उमेदवारीचा निर्णय होईल. जागा वाटप आणि उमेदवारी यामध्ये महाराष्ट्रातील 48 जागांचा निवडणुकीचा स्ट्राईक रेट जो आहे, तो कसा चांगला ठेवता येईल, या दृष्टीने निर्णय होईल. त्यानंतरच उमेदवारीबाबत चर्चा होईल.

हेही वाचा

Back to top button