पावसाळी गटारांअभावी आरोग्य धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

पावसाळी गटारांअभावी आरोग्य धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी सांगवी : महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवर पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी स्टॉर्म वॉटरच्या पाइपलाइन नव्याने टाकण्यात आल्या आहेत. जागोजागी, टप्प्याटप्प्यावर त्यासाठी चेंबर बांधून झाकणे टाकण्यात आली आहेत. मात्र, या झाकणांना छिद्रे असल्याकारणाने चेंबरमधून दिवसेंदिवस दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्ती वाढत चालली आहे. याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

येथील परिसरातील स्टॉर्म वॉटर लाईनमध्ये दिवसभराचा कचरा, प्लास्टिक, वाळू, माती, खडी आदी साचत आहे. त्यामुळे उंदीर, घुशी, सरपटणारे प्राणी यांचा वावर होताना आढळून येत आहे. येथील परिसरात विकासकामे केली गेली आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीकडे आरोग्य विभाग तसेच संबंधित प्रशासन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वेळोवेळी स्टॉर्म वॉटर लाईंनची स्वच्छ्ता, ड्रेनेज लाईनमधून गळती होऊन स्टॉर्म वॉटर मध्ये साचत असलेला मैला दुरुस्तीचे काम संबंधित विभागाने करणे अत्यावश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथील परिसरात रोगराई पसरून नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, हिवताप यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे महापालिकेचे आरोग्य विभाग स्वच्छ्ता अभियान राबवत घरोघरी जाऊन जनजागृतीचे काम करीत आहेत. तर, दुसरीकडे महापालिकेचे संबंधित विभाग आरोग्याच्या दृष्टीने स्टॉर्म वॉटर लाईंनची कोणतीही दखल घेताना दिसून येत नाही.

स्टॉर्म वॉटर लाईनची दुरुस्ती करण्याची मागणी

येथील नागरिकांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे जाऊन तक्रार केली असता अधिकार्‍यांकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष न करता त्वरित येथील स्टॉर्म वॉटर लाईनची स्वच्छ्ता करून औषध फवारणी करून देण्यात यावी, अशी मागणी येथील परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने स्टॉर्म वॉटर लाईनला लागून ड्रेनेज लाईन जोडल्या आहेत. मात्र, या ड्रेनेज लाईनच्या चेंबरमधून गळती होत असल्याने ते स्टॉर्म वॉटर लाईनमध्ये साचत आहे. त्यामुळे रस्त्यावरून पायी ये-जा करणारे नागरिक, वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सायंकाळच्या सुमारास डासांची उत्पत्ती होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा

Back to top button