Pune : ‘गो-ग्रीन’चा वापर वाढतोय | पुढारी

Pune : ‘गो-ग्रीन’चा वापर वाढतोय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून वीजबिल मिळविणार्‍या  ग्राहकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांपासून  चांगलीच वाढली असून, ही  योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत राज्यातील सुमारे 4 लाख 40 हजारांहून अधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे, महावितरणच्या राज्यात असलेल्या चारही प्रादेशिक विभागांत पुणे विभागातील ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यात अव्वलस्थानी आहेत. त्यापाठोपाठ कोकण विभागामधून या योजनेला वाढता प्रतिसाद मिळत आहे.
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ किंवा ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होते. महावितरणच्या संगणक प्रणालीमध्ये वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे प्रत्येक महिन्याला ग्राहकांना  पाठविण्यात येत आहेत. पर्यायाने  ग्राहकांना वेळेआधी वीजबिल भरण्याचा लाभही घेता येतो. वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल.याशिवाय सोबतच महावितरणच्या  संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांचे अशी एकूण 12 महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध असतात.
गरजेनुसार  वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.  राज्यात महावितरणचे पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर असे चार प्रादेशिक विभाग आहेत. त्या चारही विभागांत 62 झोन आणि 46 परिमंडल आहेत. राज्यात घरगुती, लघुदाब, शेतकरी, औद्योगिक, कमर्शिअल असे मिळून सुमारे तीन कोटींहून अधिक वीजग्राहक आहेत. त्यानुसार ज्या  वीजग्राहकाने गो-ग्रीनचा पर्याय निवडला असेल, त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. महावितरण वीज कंपनीने राज्यात 1 ऑक्टोबर 2018 सालापासून ही योजना सुरू केली आहे.

सहभाग कसा नोंदवाल?

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन या 15 अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या  ‘गो-ग्रीन’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेणे गरजेचे आहे.
  • राज्यात 4 लाख 40 हजारांहून अधिक ग्राहक भरताहेत गो-ग्रीनच्या माध्यमातून वीजबिल
  • ग्राहकांचे वाचले   52 लाख रुपये
  • 1 ऑक्टोबर 2018 सालापासून सुरू योजना

हेही वाचा

Back to top button