विज्ञान-तंत्रज्ञानाला मानव व निसर्गाप्रती संवेदनशील बनवा : जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह | पुढारी

विज्ञान-तंत्रज्ञानाला मानव व निसर्गाप्रती संवेदनशील बनवा : जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सृष्टीच्या कल्याणासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांना निसर्गाप्रती संवेदनक्षम होण्याची गरज आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश हे पंचमहाभूते भारतीयांसाठी देव होते. आपल्याला ही वैज्ञानिक समज मिळाली आहे आणि आता आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाला मानव आणि निसर्गाप्रती अधिक संवेदनशील बनवायला हवे, असे विचार आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ व रॅमन मॅगसेस पुरस्कारविजेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

एमआयटी शिक्षण समूहातर्फे आयोजित ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार 2024’ प्रदान समारंभ संपन्न झाला, पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस उपस्थित होते.

प्रा. जी. रघुराम यांना ’भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ’ , डॉ. राजेंद्र सिंह यांना ‘भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ’ आणि प्रा. डॉ. अशोक गाडगीळ यांना ‘भारत अस्मिता विज्ञान तंत्रज्ञान श्रेष्ठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, शहरी केंद्रांमध्ये गावांच्या तुलनेत अधिक सुविधा व संसाधने आहेत. शास्त्रज्ञ सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाण्याचे संकट सोडविण्याचा प्रयत्न करीत असले, तरी त्याचा आपल्या जैवविविधतेवर परिणाम होईल.

हेही वाचा

Back to top button