

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस अधिका-यांच्या बुधवारी (दि. ३१) बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पिंपरी-चिंचवडचे पोलिस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे आणि पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांची इतरत्र बदली झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड दलातील २७ पोलिस निरीक्षकांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यामध्ये पोलिस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली झाली. तर, पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांची नाशिक येथे महाराष्ट्र पोलिस अकादमीचे पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात उपायुक्तपदी बदली झाली आहे.